जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वीजेचे नवीन कनेक्शनसाठी १५०० रुपयाची लाच स्विकारतांना फत्तेपूर येथील वीज वितरण कंपनीचे सिनीयर टेक्नीशिय़न विनोद उत्तम पवार व एजंट कलिम सलीम तडवी हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. या दोघांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांच्या विरुध्द जळगाव जिल्ह्यातील पहूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईबाबत माहिती देतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, तक्रारदार हे तोरनाळे ता.जामनेर येथील मुळ रहीवासी असून ते सध्या जळगाव येथे वास्तव्यास आहेत. त्तक्रारदार यांना तोरनाळे ता.जामनेर या त्यांच्या मुळगावी तोरनाळे ता.जामनेर ग्रामपंचायतीच्या त्यांच्या वडीलांच्या नावे असलेल्या बखळ जागी त्यांनी तयार केलेल्या पत्र्यांच्या शेडमध्ये वीज मीटरचे नवीन कनेक्शन घ्यायचे होते. म्हणून तक्रारदार म.रा.वि.वि.कंपनी लि.फत्तेपूर कार्यालयात जावून वीज मीटरचे नवीन कनेक्शन मिळणेसाठी विचारपुस केली.
यावेळी सदर कार्यालयातील कर्मचारी सिनीयर टेक्नीशियन विनोद पवार व खाजगी इसम कलीम तडवी यांनी तक्रारदार यांना विज मीटरचे नविन कनेक्शन मिळणेसाठी ज्यांच्या नावे कनेक्शन घ्यायचे आहे त्यांचे आधारकार्ड, ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला, १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर व डिमांडनोट, साहेबांचे व आमचे असे एकुण ३,५०० रुपये लागतील असे सांगितले व त्याचवेळी डिमांडनोट भरणेसाठी तक्रारदार यांचेकडून २,००० रुपये घेतलेले होते.
आज विज मीटरचे नविन कनेक्शन जोडणीसाठी आरोपी क्रं.१ व २ यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष साहेबांचे नावाने उर्वरीत १५०० रुपयांची लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली लाच रक्कम पंचासमक्ष स्वतः पवार यांनी फत्तेपूर गावातील बुलढाणा ते जामनेर रोडवरील बुलढाणा अर्बन बँकेच्या शेजारील बंद दुकानाजवळ स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. म्हणून दोन्ही आरोपीविरुद्ध पहूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
Jalgaon ACB Raid Trap Bribe Corruption