नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा सर्वच थरातून निषेध व्यक्त केला जात आहे. जाखोरी (ता.नाशिक) येथील ग्रामपंचायतीनेही कोश्यारी यांचा कडक शब्दात निषेध केला आहे. गावाने विशेष ग्रामसभा घेऊन आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या. कोश्यारी यांचा निषेध राजकीय पक्षांनी करणे स्वाभाविक असून पण निषेध नोंदविणारी जाखोरी ग्रामपंचायत राज्यात एकमेव ठरली आहे.
शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहेत, असे वक्तव्य करून कोश्यारी यांनी अख्या महाराष्ट्राचा रोष ओढवून घेतला. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांनी कोश्यारी यांचा वक्तव्याविरोधात राज्यभर आंदोलन करून निषेध नोंदविला. काही ठिकाणी प्रतीकात्मक अंत्य यात्रा काढण्यात आली तरी काही भागात पुतळे दहन करण्यात आले. कोश्यारी यांच्या वक्तव्याचा समाचार जाखोरी गावातील ग्रामस्थांनीही घेतला. ग्रामीण भागातही तीव्र पडसाद उमटल्याचे यानिमित्ताने दिसून आले. मंगळवारी ग्रामसभा घेण्यात आली. राज्यपालाच्या विरोधात निषेधाचा ठराव करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा जोडे मारो आंदोलन झाले.यावेळी राज्यपाल हटाव च्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य म्हणाले की, भाजपा जाणुन बुजून असे बेताल वक्तव्य करते. तसे प्रोत्साहन त्यांचे असते. त्यांच्या विचारसरणीचे नेते व पदावर विराजमान लोक महाराष्ट्रातील नागरिक व त्यांचे अराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बेताल वक्तव्य करून चाचपणी करतात. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आम्ही मोठे आहोत, असा गर्व त्यांना झाला आहे. त्याचा आम्ही ग्रामस्थ निषेध करत आहे. राज्यपाल हटवा आणि महाराष्ट्र वाचवा असे आमचे मत आहे, असे यावेळी सदस्यांनी सांगितले.
ग्रामसभेला सरपंच मंगला जगळे, उपसरपंच ज्योती पवार, सदस्य विश्वास कळमकर, राहुल धात्रक, तुकाराम चव्हाण, नितीन कळमकर, मधुकर पवार, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप कळमकर, रतन कळमकर, अरुण धात्रक, संदीप धात्रक, योगेश जाधव, दिनेश क्षिरसागर, रोशन जाधव, युवराज जगळे, अमोल मगर, केशव धात्रक, संतोष ताजने, सोपान कळमकर, सचिन जगळे, सिकंदर सय्यद, भाऊसाहेब कळमकर, जयराम क्षीरसागर, सुरेश विंचू, सोपान बोराडे आदीसह मोठ्या ग्रामस्थ उपस्थित होते.
Jakhori Grampanchayat Special Meeting Decision Governor