नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सुप्रसिद्ध जैन साध्वी प.पू.सुशीलकंवरजी म.सा. (माताजी महाराज) आणि वाणीभूषण पू प्रीतिसुधाजी म.सा. यांचा ६४ वा “दीक्षा वर्धापन दिन” शुक्रवार ७ मार्च २०२५ रोजी संपन्न होत आहे. समस्त भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेल्या या साध्वींनी जैनच नव्हे जैनेतर समाजासाठी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने उदबोधन करून भारतीय संस्कृतीचे संवर्धन व मानवता धर्म पालन करण्यासाठी अपूर्व योगदान दिलेले आहे.
वाणीभूषण पू प्रीतिसुधाजी म.सा. यांचे हिंदी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांचे शब्द श्रोत्यांच्या ह्रदयात कायमस्वरुपी राहतात. शीघ्र कवयित्री असल्या कारणाने अनेक काव्य भजने आणि स्तवन लोकप्रिय झालेले आहेत. त्याचबरोबर पू माताजी महाराजांच्या प्रेरणेतून गोरक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे. भारतात त्यांच्या प्रेरणेने १६ गोरक्षण संस्था स्थापन झालेल्या असून सर्व गोशाळा यशस्वीपणे प्रगतीपथावर आहेत हे विशेष! या कार्यक्रमास महाराष्ट्रातून व इतर राज्यातून मान्यवर व्यक्तींसह मोठ्या संख्येने लोक येणार आहेत
या दोन दिवसीय समारोहात सौ मंगलबाई पारसमलजी बोरा परिवार तसेच मोहनलालजी लालचंद लोढा परिवार व शांतीलालजी इंदरचंदजी दुगड परिवार यांच्या वतीने गौतमप्रसादीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
देवळाली कॅम्प येथील लामरोड भाटिया स्टॅापजवळ केशरवाडी सभागृहात आयोजित या दीक्षा वर्धापन दिन समारोहास सर्वांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन सुप्रीम भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आलेले आहे.
