इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटकातील बेळगाव परिसरातील चिक्कडी तालुक्यात हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमाचे जैनमुनी कमकुमार नंदी महाराज यांची निर्घृण हत्येबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुनींच्या मृतदेहाचे तुकडे करून बोअरवेलमध्ये टाकण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हत्येसंदर्भात सुमारे ६ लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच स्वामींची डायरी पोलिसांच्या हाती लागली असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठा उलगडा होण्याची आणि काही जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
कसून चौकशी
जैन मुनींची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयाच्या आधारे नारायण बसप्पा माडी आणि हसन दलायथ यांना ताब्यात घेतले आहे. दोघांनी चौकशीत जैन साधूची हत्या केल्याचे मान्य केले आहे. खून कोणत्या ठिकाणी झाला, मृतदेह कोठे फेकून दिला याबाबत आरोपी पोलिसांची दिशाभूल करत होते. गेल्या ८ जुलै रोजी, पोलिसांनी काटकभावी गावातील बोअरवेलमधून काही बाबी ताब्यात घेतल्या. जैन मुनींचे अवयव साडीत बांधलेल्या अवस्थेत जप्त केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह जैन समाजाच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केली.
संरक्षण देण्याची मागणी
जैन मुनी कामकुमार महाराज यांची निर्घृण हत्याप्रकरणानंतर जैन मुनींना संरक्षण देण्याची मागणी नवग्रहतीर्थ क्षेत्राचे आचार्य गुणधरनंदी महाराज यांनी केली. जैन मुनी यांना संरक्षण देण्याची मागणी करत आंदोलन हाती घेतले होते. राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी येथे भेट देऊन जैन मुनींना रक्षण देण्याबाबत ग्वाही दिली. त्यामुळे आंदोलन मागे घेतले. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची गरज नसल्याचेही परमेश्वर यांनी स्पष्ट केले.
ती राख डायरीची नाही
स्वामींची डायरी जाळून टाकल्याचे दोन्ही संशयितांनी पोलिसांना सांगितले होते. मात्र, पोलिसांनी राख बंगळूरला तपासासाठी पाठविली. ती राख डायरीची नसल्याचे स्पष्ट झाले. त्यावर पोलिसांनी पुन्हा चौकशी करून डायरी शोधून काढून ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. या डायरीत स्वामींच्या आर्थिक विषयांवर प्रकाश पडणार आहे. त्यामुळे त्यात नावे असलेल्यांची चौकशी पोलिस करण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा संशयित मारेकऱ्यांनी ही डायरी जाळल्याचे म्हटले होते. याबाबतही पोलिस चौकशी करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनीही घेतली माहिती
पोलिसांनी घटनास्थळासह अनेक ठिकाणी मारेकऱ्यांना फिरवून पुरावे गोळा करण्याचे काम केले आहे. आता संशयित मारेकऱ्यांना न्यायालयीन कोठडी आहे. त्यामुळे अधिक चौकशी करून लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पण, तपासानंतर काही मुद्दे पुढे आले आहेत. कोणामुळे घटना घडली, त्याकडे गुणधरनंदी महाराजांनी लक्ष वेधले. परमेश्वर यांनी जैनमुनी हत्या प्रकरण पुढे आल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेबाबत एडीजीपी यांच्यांशी फोन करून चर्चा केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही माहिती घेतली आहे.त्यानंतर मंदीर, जैन मुनींना संरक्षण दिले जाईल. स्वतंत्र महामंडळाची मागणीही केली आहे.