इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहिल्यानगर : तोफखाना पोलिस व दक्षिण कमांड मिलिट्री इंटेलिजन्स यांच्या संयुक्त पथकाने अवैध शस्त्र व बनावट शस्त्र परवाना देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये १२ बोअर रायफल, ९ रायफल व ५८ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
अहिल्यानगर शहरात अवैध शस्त्रांची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार बनावट ग्राहक पाठवून अवैध शस्त्रांची विक्री केली जात असल्याची खात्री करण्यात आली. यानंतर राजौरी जिल्हाधिकारी (जम्मू व काश्मीर) यांना पत्र पाठवून माहिती घेतली असता वितरित करण्यात आलेली शस्त्रे अवैध असून, बनावट परवाने असल्याचे त्यांनी कळवले. अहिल्यानगर जिल्ह्यातील बँकासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नोकरी मिळविल्याचे उघडकीस आले. यामध्ये शेर अहेमद गुलाम हुसेर (रा. कलाकोठ, राजौरी) हा मुख्य आरोपी असून, सुरक्षा रक्षकांची नोकरी मिळण्याकरिता बनावट शस्त्र परवाना व १२ बोअर रायफल मिळवून देत होता. यासाठी तो प्रत्येकी पन्नास हजार घेत असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तोफखाना पोलिस व दक्षिण कमांड मिलिट्री इंटेलिजन्स यांनी अहिल्यानगर, श्रीगोंदे, सोनई, पुणे अशा विविध ठिकाणी नोकरी करत असलेल्या नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेण्यात आलेले सर्व जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील रहिवासी असून, सध्या अहिल्यानगरसह पुण्यात वास्तव्यास होते. यात शब्बीर मोहमंद इक्बाल हुसैन गुज्जर (वय ३८, रा. नागापूर, अहिल्यानगर), महंमद सलीम ऊर्फ सालेम गुल महंमद (३२, नागापूर, अहिल्यानगर), महंमद सफराज नजीर हुसैन (२४, घोगरगाव, अहिल्यानगर), जहांगीर झाकीर हुसैन (२८, रा. नागापूर, अहिल्यानगर), शाहबाज अहमद नजीर हुसैन (३३, रा. श्रीगोंदे), सुरजीत रमेशचंद्र सिंग (नेवासे, अहिल्यानगर), अब्दुल रशिद चिडीया (३८, रा. पुणे), तुफेल अहमद महंद गाजीया (स्वारगेट, पुणे), शेर अहमद गुलाम हुसैन (रा. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई दक्षिण कमांड मिलिट्री इंटेलिजन्स, पुणे व पोलिसांनी केली.