नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीच्या दिवशी काढण्यात आलेल्या शोभायात्रेदरम्यान झालेल्या सांप्रदायिक हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी सोनू शेख आणि अंसार शेख या दोन आरोपींविषयी खूपच महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
इंडिया टु़डेच्या वृत्तानुसार, दोन्ही मुख्य आरोपी पश्चिम बंगालच्या हल्दिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. भंगाराच्या व्यवसायातून आर्थिक संपन्न झालेल्या घरातून सोनू आणि अंसार आलेले आहेत. मुख्य आरोपींकडे हाय-एंड बीएमडब्ल्यू कारसह इतर आलिशान कार आहेत. दोघेही नवी दिल्ली येथे राहतात.
हिंसाचारादरम्यान सोनूने फायरिंग केल्याचा आरोप आहे. गोळीबार करतानाचा सोनूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आरोपी सोनूची अनेक नावे सांगितली जात आहेत. सोनू शेख, सोनू चिकना, इमाम आणि युनूस या नावांनी त्याला ओळखले जाते.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात झालेल्या हिंसाचारादरम्यान गोळीबार करतानाचा निळा कुर्ता परिधान केलेल्या सोनू ऊर्फ इमाम ऊर्फ युनूसचा व्हिडिओ व्हायरल होत होता. आरोपी सोनूला अटक करण्यात आली आहे.
व्हिडिओमध्ये गोळी चालवताना दिसणारा सोनू चिकना याच्याविरुद्ध शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या हत्यारासह आरोपी सोनूला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, दिल्लीतील रोहिणी न्यायालयाने दोन्ही आरोपींना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर इतर बारा आरोपींची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. १५ एप्रिल रोजी दोन्ही आरोपींना शोभायात्रा निघणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर त्यांनी कट रचला असा आरोप दिल्ली पोलिसांनी सुनावणीदरम्यान केला.