नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) असे जाहीर केले आहे की, भारत सरकारने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असलेल्या खुपऱ्या रोगाचे देशातून समूळ उच्चाटन केले असून हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठणारा भारत दक्षिण-पूर्व आशियाई क्षेत्रातील तिसरा देश ठरला आहे. नवी दिल्ली येथे डब्ल्यूएचओच्या दक्षिण-पूर्व आशियाई प्रदेशासाठीच्या क्षेत्रीय समितीच्या आज झालेल्या बैठकीत, डब्ल्यूएचओ दक्षिण-पूर्व आशियाई प्रदेशाच्या क्षेत्रीय संचालक सायमा वाझेद यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालक आराधना पटनाईक यांच्याकडे या संदर्भातील अधिकृत प्रमाणपत्र सुपूर्द केले.
खुपऱ्या हा डोळ्यांवर परिणाम करणारा जिवाणूजन्य संसर्ग आहे. डब्ल्यूएचओ ने या रोगाला दुर्लक्षित उष्णकटिबंधीय संसर्ग असे संबोधले आहे. डब्ल्यूएचओच्या अंदाजानुसार जगातील दीडशे दशलक्ष लोकांना खुपऱ्या रोगाचा संसर्ग झाला असून त्यापैकी 6 दशलक्ष लोकांना अंधत्व आले आहे किंवा त्यांची दृष्टी अधू करणारी गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. हलक्या दर्जाच्या पर्यावरणीय परिस्थितीत राहणाऱ्या वंचित समुदायाच्या लोकांमध्ये खुपऱ्या आजार प्रामुख्याने आढळतो.
देशात 1950-60 या कालावधीत अंधत्व येण्याच्या कारणांमध्ये खुपऱ्या हे प्रमुख कारण होते. त्यानंतर वर्ष 1963 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय खुपऱ्या नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केली आणि नंतरच्या काळात भारताच्या राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमात (एनपीसीबी) या खुपऱ्या नियंत्रणविषयक प्रयत्नांचे एकत्रीकरण करण्यात आले.
वर्ष 1971 मध्ये देशात खुपऱ्या रोगामुळे अंधत्व येण्याचे प्रमाण 5% होते. नंतरच्या काळात राष्ट्रीय अंधत्व तसेच अधू दृष्टी नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत (एनपीसीबीव्हीआय)राबवण्यात आलेल्या विविध हस्तक्षेपांमुळे हे प्रमाण 1% पेक्षाही कमी करण्यात यश आले आहे. अंतिमतः, खुपऱ्या रोगाविरुद्धच्या अनेक वर्षांच्या लढ्यानंतर, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असलेल्या या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.