नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे देशाचे नवे उपराष्ट्रपती झाले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी आणि विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला आहे. धनखड यांना ५२८ मते मिळाली. त्यापैकी 15 मते अवैध ठरली. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली.
सुरुवातीपासूनच एनडीएचे उमेदवार धनखड यांच्या विजयाची अटकळ बांधली जात होती. संसदेत उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी एकूण ७८० पैकी ७२५ खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तृणमूल काँग्रेसचे ३४, सपा आणि शिवसेनेचे चार आणि बसपचे एक खासदार मतदानापासून दूर राहिले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान चालले आणि एक तासानंतर म्हणजेच ६ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली.
जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी उपराष्ट्रपती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. या निवडीनंतर दिल्लीतील भाजप मुख्यालयात जल्लोषाचे आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशांसह भाजप कार्यकर्ते नाचताना दिसले.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एकूण ५५ खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. यामध्ये तृणमूलच्या ३४ खासदारांचा समावेश होता. मात्र, पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्या आदेशानंतरही दोन तृणमूल खासदारांनी मतदानात भाग घेतला. शिशिर आणि दिव्येंदू अधिकारी यांचा त्यात समावेश आहे. याशिवाय सपाच्या २ आणि शिवसेनेच्या ४ खासदारांनी आणि बसपच्या एका खासदारानेही मतदान केले नाही. सनी देओल आणि संजय धोत्रे या भाजपच्या दोन खासदारांनीही प्रकृतीचे कारण सांगून मतदानापासून दूर राहिले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य अभिषेक मनू सिंघवी यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पीपीई किट परिधान करून संसद भवन गाठले आणि मतदानाचा हक्क बजावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम मतदान केले. पंतप्रधान मोदींशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्हील चेअरवर जाऊन मतदान केले. सोनिया गांधींसह काँग्रेस आणि सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी मतदान केले.
राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील दुर्गम किठाना गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपर्यंतचा प्रवास खूप रंजक आहे. जनता दल पक्षाचे सदस्य म्हणून जगदीप धनखड १९८९ मध्ये राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातून पहिल्यांदा संसदेत पोहोचले होते. या काळात त्यांनी संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहिले. १९९३ मध्ये अजमेर जिल्ह्यातील किशनगड येथून ते राजस्थान विधानसभेत पोहोचले. २०१९ मध्ये केंद्र सरकारने त्यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली.
Jagdeep Dhankhar is New Vice President of India
Margaret Alva Election