सिन्नर- तालुक्यातील कुंदेवाडी येथील श्री जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेस ३१ मार्च अखेर २३,३७,५०२ रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन नामकर्ण आवारे यांनी दिली.
मार्च २०२० पासून सुरु झालेल्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच पतसंस्थांचे व्यवहार हे ठप्प झालेले होते. या वातावरणाचा पतसंस्थांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम झालेला आहे. या परिस्थितीमध्ये ग्राहक वर्गास चांगल्या दर्जाची सेवा देत जगदंबा पतसंस्थेने आर्थिक वृद्धीचा आलेख उंचावत ठेवला आहे. मार्चअखेर पतसंस्थेच्या एकूण ठेवी २४,८०,९७,११४/- इतक्या असून मागील वर्षाच्या तुलनेत २,९३,४६,८८७/- रक्कमेने ठेवींमध्ये वाढ झाली आहे. मार्चअखेर पतसंस्थेचे एकूण कर्ज वाटप १८,७३,५५,७९८/- इतके असून मागील वर्षाच्या तुलनेत २,७४,६४,२८९/- रक्कमेने कर्ज वितरणामध्ये वाढ झाली आहे. पतसंस्थेचे एकूण वसूल भागभांडवल ८१,३६,३८० रुपये इतके असून एकूण निधी १,७२,०७,६२३/- इतका आहे. बाहेरील बँकेत मुदतठेव गुंतवणूक ६,९२,७९,८४०/- इतकी केलेली असून गुंतवणुकीचे ठेवीशी असलेले प्रमाण २८% इतके आहे. सी.डी. रेशो ७१% व कर्ज वाटपाचे प्रमाण ७३% असून थकबाकीची प्रमाण १४% इतके आहे.
कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पतसंस्थेच्या कर्मचारी वर्गाने प्रत्येक सभासद ग्राहकाशी फोन, मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांच्या आरोग्य स्वास्थ्याची तसेच त्यांच्या उद्योग व्यापाराविषयी चौकशी करून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोरोनाच्या नावाखाली कर्जदारांची कर्ज न भरण्याची मानसिकता वाढीस लागलेली होती. याचा अभ्यास करून कर्ज वसुलीवर प्रतिकूल परिणाम होऊ दिलेला नाही. पतसंस्थेस कलम १५६ खालील कर्ज वसुलीचे अधिकार प्राप्त असल्याने कायदेशीर कर्ज वसुलीचे कामकाज नियमित चालू आहे. मे २०२० मध्ये कोरोनाच्या काळात कुंदेवाडी गावातील आदिवासी बंधूना प्रत्येक कुटुंबास २ लिटर खाद्यतेल याप्रमाणे २५० कुटुंबाना वाटप केलेले आहे.
वावी येथील कोरोना सेंटर मधील कोरोना बाधित ५० रुग्णांना दोन वेळचे १४ दिवस मोफत जेवण दिलेले आहे. पतसंस्थेच्या एकूण तीन शाखा असून तिन्ही शाखांचे काम स्वमालकीच्या इमारतीत चालते. सिन्नर शाखेमधून स्वतंत्र जलद सोने तारण कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिलेली असल्याने ग्राहक वर्गास त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. तसेच मिनी ATM, RTGS सुविधा, फोन पे, गुगल पे द्वारे कॅशलेस सुविधा ग्राहक खातेदारांकरीता उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळ, पुणे यांचे आदेशान्वये रोख तरलता प्रमाण, वैधानिक तरलता प्रमाण, कर्ज व ठेवीचे व्याजदर या बाबीचे तंतोतंत पालन केलेले आहे. पतसंस्थेच्या १० कर्मचारी व अधिकार्यांसाठी संस्थेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना कवच विमा पॉलिसी उतरवत त्यांना प्रत्येकी पाच लाख विम्याचे संरक्षण दिले आहे.
पतसंस्थेच्या प्रगतीत व्हाईस चेअरमन इंदिरा मुदबखे, संचालक कमलाकर पोटे, रामेश्वर गोळेसर, रामभाऊ माळी, अविनाश पोटे, प्रभाकर पिंपळे, विलास नाठे, आनंदा सोनवणे, कमल नाठे, व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांचे सहकार्या महत्त्वाचे ठरत आहे.