मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे. अॅलन फर्नांडिस असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने आयेशा श्रॉफ यांची तब्बल ५८ लाखांची फसवणूक केली.
आयेशा यांनी केलेल्या या तक्रारीची नोंद पोलिसांनी केली असून त्यांच्यावर आयपीसीच्या अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या व्यक्तीला अटक करण्यात आलेली नाही. अॅलन फर्नांडिस नावाच्या व्यक्तीवर फसवणूक केल्याचा आरोप आयेशाने केला आहे. पोलिसांच्या वतीनं आयपीसी कलम ४२०, ४०८, ४६५, ४६८अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कलमांच्या अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला ७ वर्षे तुरुंगवास आणि दंड देखील भरावा लागतो.
काय आहे प्रकरण
आरोपी अॅलन फर्नांडिस याची एमएमए मट्रीक्स कंपनीमध्ये २० नोव्हेंबर २०१८ रोजी डायरेक्टर ऑफ ऑपरेशन म्हणून नियुक्ती केली गेली होती. एमएमए मट्रीक्स जीम हे टायगर श्रॉफचे असून तो चित्रपटाच्या कामात व्यस्त असल्याने त्याची आई आयेशा तेथील सर्व कामकाज पाहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, एमएमए मॅट्रिक्समध्ये येणाऱ्या लोकांना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यासाठी ३ लाख रुपये मासिक वेतन देऊन अॅलन फर्नांडिस याला नोकरीवर ठेवले होते.
अॅलन फर्नांडिस याने या कंपनीतर्फे भारतात आणि भारताबाहेर अशा एकूण ११ स्पर्धा आयोजनासाठी ज्यादा रक्कम घेतली तसेच जीममधील मार्शल आर्टचे शिक्षण घेत असलेल्या लोकांची डिसेंबर २०१८ ते जानेवारी २०२३ पर्यंत जमा झालेली फी ची एकूण रक्कम ५८.५३,५९१ रुपये ही कंपनीच्या बँक खातेमध्ये न भरता ती स्वतःच्याच बँकेतील खातेमध्ये ठेवली. तसेच काही रक्कम रोख स्वरूपात घेऊन कंपनीचा विश्वासघात करून फसवणूक केली, अशी माहिती मिळते आहे.
आयेशाची कारकीर्द
आयशा श्रॉफविषयी बोलायचं झालं तर त्या अभिनेता जॅकी श्रॉफ यांची पत्नी आहेत. त्यासोबत त्या एक अभिनेत्री, मॉडल देखील आहेत. आता त्या अभिनय क्षेत्रापासून लांब असल्या तरी प्रोड्युसर म्हणून काम करत आहेत. जॅकी यांच्यासोबत लग्नबंधनात अडकल्यानंतर त्यांनी मोठ्या पडद्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला.
आयशानं तिच्या करिअरच्या सुरुवातीला ‘तेरी बाहों में’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट १९८४ मध्ये प्रदर्शित झाला. आयेशा श्रॉफ या सोशल मीडियावर अॅक्टिव असतात. जॅकी श्रॉफ आणि टायगर श्रॉफ यांच्यासोबतचे फोटो त्या सोशल मीडियावर शेअर करतात. आयेशा श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे.
Jackie shroff wife Ayesha 58 Lakh Cheating