नाशिक(इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषद नाशिकमध्ये इमारत व दळणवळण विभागांतर्गत ग्रामीण भागातील भौतिक विकासकामांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया अधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनानुसार इंटेलिजेन्ट वर्क मॅनेजमेंट सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी या प्रणालीचे अनावरण केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, उपअभियंता शामकुमार सोनवणे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे नाशिक जिल्हा परिषद एक डिजिटल व कार्यक्षम यंत्रणेकडे वाटचाल करत असून, ग्रामीण विकासकामांमध्ये गतिशीलता आणि पारदर्शकता यांना गती मिळणार आहे. बांधकामांशी निगडीत सर्व माहितीचे डिजिटल दस्तऐवजीकरण झाल्याने एका सर्व माहिती एकाच प्रणालीवर उपलब्ध होणार आहे.
IWMS प्रणालीचे फायदे :
- आर्थिक बचत – कमी मनुष्यबळात जास्त कामे पार पाडता येतील. तसेच अंदाजपत्रक नियोजन, खर्चावर नियंत्रण आणि बचत शक्य होईल.
- वेळेची बचत – तांत्रिक, प्रशासकीय व लेखा विभागातील प्रक्रिया संगणकीकरणामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार आहे, व कामकाज जलद होणार.
- गुणवत्ता हमी – कामांचे संपूर्ण व्यवस्थापन प्रणालीद्वारे होणार असल्याने गुणवत्ता नियंत्रण सुनिश्चित होते आणि निर्धारित मानकांनुसार कामे होणार.
- केंद्रिय देखरेख – डॅशबोर्डच्या माध्यमातून सर्व कामांवर एकत्रित नजरे ठेवता येते. त्यामुळे कामांमध्ये पारदर्शकता वाढेल व विलंब टाळता येईल.
- अचूकता – प्रणाली पूर्णतः इनपुट आधारित असून, ऑटोमेटेड गणनांमुळे मानवी चुकांचा संभव कमी होणार.
- माहिती ऍक्सेस – वेब-आधारित प्रणालीमुळे अधिकार्यांटना आवश्यक माहिती कुठूनही व केव्हाही लॉगिनद्वारे मिळू शकणार.
- ऑटोमेशन – मॅन्युअल प्रक्रियांमुळे होणारा वेळ वाचेल व प्रशासकीय कार्यक्षमता वाढणार.
परिवर्तनामधील एक महत्त्वपूर्ण पाऊल
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार तयार करण्यात आलेल्या इंटेलिजेन्ट वर्क मॅनेजमेंट सिस्टिममुळे जिल्हा परिषदेचे प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि गतिमान होणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून विकासकामांच्या प्रक्रियांमध्ये अचूकता, गुणवत्ता व वेळेची बचत साधता येणार आहे. ही प्रणाली नाशिक जिल्हा परिषदेच्या डिजिटल परिवर्तनामधील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
– डॉ. अर्जुन गुंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक