मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया सोमवार १२ जून २०२३ पासून सुरू करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दि. अं. दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेसंबंधीची व प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाइन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज स्वीकृती, विकल्प सादर करणे व प्रवेश प्रक्रियेचे विविध टप्पे आदी प्रक्रियेबाबत समुपदेशन सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रोज आयोजित करण्यात येणार आहेत.
माहिती पुस्तिकेत नमूद असलेल्या टप्प्याप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यासंदर्भातील वेळापत्रक तसेच राज्यातील शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ http://www.dvet.gov.in व https://admission.dvet.gov.in यासह प्रादेशिक कार्यालय, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय, सर्व शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट 2023 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Centralized Online Admission Process) पध्दतीने करण्यांत येत आहे. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशाची आतुरतेने वाट पाहत असतो. यावर्षी एकूण 418 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व 574 अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधुन अनुक्रमे 95,380 व 59,012 अशा एकूण 1,54,392 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.
यावर्षी प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसायांची संख्या 83 असून त्यामध्ये पारंपरिक इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, वेल्डर यासारख्या लोकप्रिय व्यवसायांबरोबरच नव्याने सुरू होणाऱ्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर तसेच ड्रोन टेक्निशियन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे.
उपलब्ध जागांपैकी 53600 जागा मुलींसाठी राखीव असून इतर प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार अनुसूचित जातींसाठी 20072, अनुसूचित जमातीसाठी 10808, इतर मागासवर्ग 29335, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 15439, विमुक्त जाती 4631, भटक्या जमाती (ब) (क) व (ड) यासाठी अनुक्रमे 3859, 5404 व 3088 एवढ्या जागा उपलब्ध आहेत. याचबरोबर अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी 2548, दिव्यांग उमेदवारांसाठी 7719 व खुल्या गटातील उमेदवारांसाठी 61756 जागा उपलब्ध आहेत.
2023 या वर्षापासून नव्याने 257 तुकड्यांना डीजीटी, नवी दिल्ली यांचेकडून संलग्नता प्राप्त झालेली असून या व्यवसायांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्याच्या प्रवेश क्षमतेमध्ये 5140 एवढ्या भरघोस जागांची वाढ झालेली आहे. या वर्षभरात ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग अंतर्गत नव्याने 30 तुकड्यांना मान्यता प्राप्त झालेली असून या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना थेट औद्योगिक आस्थापनांमध्ये जाऊन सुमारे सहा महिने एवढ्या कालावधीपर्यंतच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. यामुळे या प्रशिक्षणार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल.
वर्ष 2023 मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुणे येथे एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या व्यवसायाच्या प्रत्येकी दोन तुकड्यांना डीजीटी, नवी दिल्ली यांचेकडून संलग्नता प्राप्त होणे अपेक्षित असून यातील प्रत्येकी एका तुकडी मध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. याचबरोबर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला (मुलींची), धुळे, पुणे (मुलींची), सांगली, नाशिक, जालना, अमरावती, नागपूर, मुलुंड, अंबरनाथ, गडचिरोली, घनसावंगी अशा एकूण 12 संस्थांमधून ड्रोन टेक्निशियन या व्यवसायामध्ये नव्याने प्रवेशाला सुरुवात होणार आहे या व्यवसायाच्या माध्यमातून भारत ड्रोन टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.दिगांबर दळवी यांनी दिली आहे.
ITI Admission Process Date Online Application