मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, ठाणे आयुक्तालयाच्या कर- चुकवेगिरी विरोधी शाखेने सुमारे ४७ कोटी ३२ लाखाच्या बनावट दाव्यांचा समावेश असलेली बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटची मोठी फसवणूक उघडकीस आणली आहे.
अंतर्गत विकसित गुप्तचर विभाग आणि प्रगत डेटा विश्लेषण साधनांद्वारे हे प्रकरण उघडकीस आले. तपासात आढळून आले की विवेक राजेश मौर्य द्वारे संचालित मेसर्स केएसएम एंटरप्रायझेसने वस्तू किंवा सेवांचा कुठलाही प्रत्यक्ष पुरवठा न करता फसवणूक करून स्वतः आयटीसीचा लाभ मिळवला आणि वळवला. त्याच्या निवासस्थानी घातलेल्या छाप्यात अनेक बँक पासबुक, चेकबुक, अनेक मोबाईल फोन आणि अनेक बनावट कंपन्यांशी संबंधित कागदपत्रे यासह गुन्हे सिद्ध करणारे पुरावे जप्त करण्यात आले.
तपासादरम्यान, मौर्य याने फसवणूकीचा सूत्रधार असल्याचे, कमिशन मिळवल्याचे आणि बेकायदेशीर व्यवहारांचा थेट लाभ उचलल्याचे कबूल केले. त्याला १९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आणि ठाणे येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता त्यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.