इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इटलीच्या संसदेत पहिल्यांदाच एका बाळाला स्तनपान करण्यात आले. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, इटालियन महिला खासदार गिल्डा स्पोर्टिएलो यांनी आपल्या बाळाला फेडेरिकोला चेंबर ऑफ डेप्युटीजमध्ये स्तनपान केले. सर्व खासदारांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. इटलीसारख्या पुरुषप्रधान देशात कनिष्ठ सभागृहातील सदस्याने बाळाला स्तनपान देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
काळानुसार अनेक बदल होताना आपण पाहतो. त्यानुसार बायका देखील आपल्या हक्कांसाठी जागरुक होताना दिसत आहेत. बाळांना स्तनपान करणे हा खरं तर बायकांचा मूलभूत अधिकार आहे. पण, लाज म्हणून अशा गोष्टी महिला टाळत होत्या. याचा त्रास बाळांना होत होता. हे सगळे मुद्दे बाजूला ठेवत केवळ बाळासाठी अशाप्रकारे निर्णय घेणाऱ्या महिलेचे स्वागत होते आहे.
गेल्या वर्षी झाला निर्णय
संसदीय अधिवेशनाच्या अध्यक्ष जॉर्जिओ म्हणतात की, सर्व पक्षांच्या पाठिंब्याने एखाद्याने बाळाला दूध पाजण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी इटलीमध्ये संसदीय नियमांच्या पॅनेलने महिला खासदारांना त्यांच्या मुलांसह संसदेच्या चेंबरमध्ये येण्याची आणि एक वर्षापर्यंतच्या बाळाला स्तनपान करण्यास परवानगी देण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये घेतला होता.
फाइव्ह-स्टार मूव्हमेंट पार्टीशी संबंधित गिल्डा स्पोर्टिएलो म्हणाल्या की, अनेक महिला वेळेपूर्वी स्तनपान थांबवतात. खरं तर महिलांना हे थांबवायचे नसते. पण, त्यांच्यावरील जबाबदाऱ्यांमुळे त्यांना असं करता येत नाही.
दोन तृतीयांश खासदार पुरुष
इटलीतील दोन तृतीयांश खासदार पुरुष आहेत. इटलीच्या इतिहासात प्रथमच, जॉर्जिया मेलोनी यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. आज झालेली घटना ही इटलीमध्ये प्रथमच घडली आहे. याआधी तेरा वर्षांपूर्वी लिसिया रोन्झुली यांनी स्ट्रासबर्ग येथील युरोपियन संसदेत आपल्या मुलीला स्तनपान केले होते.
आईचे दूध सर्वाधिक महत्त्वाचे
स्तनपान करणे नवजात बाळासाठी महत्त्वाचे आहे. आईचे दूध हे ऍन्टीबॉडीज, जीवनसत्त्वे, प्रथिने, सूक्ष्म पोषक घटकांचे परिपूर्ण मिश्रण आहे. हा बाळासाठी निसर्गाने दिलेला आहार आहे. त्याला दुसरा काहीही पर्याय असू शकत नाही.
आईच्या दूधाचे फायदे
नवजात बाळासाठी आरोग्याव्यतिरिक्त इतर अनेक कारणांसाठी आईचे दूध आवश्यक असते. मुलाच्या संज्ञानात्मक, मानसिक आणि शारीरिक विकासामध्ये आईच्या दुधाप्रमाणेच महत्त्वाची भूमिका बजावते. नवजात बालकाला किमान ६ महिने वयापर्यंत आईचे दूध मिळायलाच हवे.
Italy MP Gilda Sportiello Breast Feeding in Parliament