नवी दिल्ली – स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोषाची तयारी सुरू असताना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (ISRO) धक्का बसला आहे. इस्त्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रांतून पहाटे पाच वाजून ४३ मिनिटांनी जीएसएसव्ही-एफ १० च्या सहाय्याने ईओएस-०३ उपग्रहाचे प्रक्षेपण केले. परंतु क्रायोजेनिक इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने ही मोहीम यशस्वी होऊ शकली नाही.
इस्रोचे अध्यक्ष सिव्हन म्हणाले, की प्रक्षेपणात क्रायोजेनिक टप्प्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे GSLV-F/EOS-03 मोहीम पूर्णपणे यशस्वी होऊ शकली नाही. उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले असते तर त्याचा भारताला मोठा फायदा झाला असता. जीएसएलव्ही-एफ-१० च्या माध्यमातून ईओएस-०३ प्रक्षेपणासाठी २६ तासांची उलटगणना श्रीहरिकोटामध्ये बुधवारी सुरू झाली होती.
स्पेसप्लाइट नाऊच्या वृत्तानुसार, EOS-03 उपग्रह अंतराळ कक्षेत स्थापित करण्यास इस्त्रोला यश आले नाही. वर्ष २०१७ सालानंतर भारतीय अंतराळ प्रक्षेपणाचे हे पहिलेच अपयश आहे. यापूर्वीच्या इस्त्रोच्या सलग १४ मोहिमा यशस्वी ठरल्या आहेत. ब्राझीलचे भू अवलोकन करणारे एमेजोनिया-१ आणि १८ इतर लहान उपग्रहांच्या प्रक्षेपणानंतर २०२१ मधील इस्रोचे हे दुसरे प्रक्षेपण होते.
आजचे प्रक्षेपण एप्रिल किंवा मे महिन्यात करायचे होते. परंतु कोविड -१९ महामारीच्या दुसर्या लाटेमुळे ते लांबणीवर टाकण्यात आले होते. जीएसएलव्ही-एफ १०/ईओएस-०३ मोहिमेची उलटी गणना बुधवारी पहाटे तीन वाजून ४३ मिनिटांनी सतीश धवन अंतराळ केंद्रात सुरू झाली होती. देश तसेच देशाच्या सीमावर्ती भागांवर देखरेख ठेवणे, त्या भागातील छायाचित्रे वास्तविक वेळेत उपलब्ध करून देणार आहे. तसेच नैसर्गिक संकटांवर देखरेख ठेवणार आहे.