नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांद्रयान-3 च्या चंद्रावर अवतरण प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी लोकांचा प्रचंड प्रतिसाद विचारात घेऊन पुढील महिन्यात इस्रो देशभरात विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांना एकत्र आणून एका जागरुकता मोहिमेचा प्रारंभ करणार असल्याची माहिती केंद्रीय अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.
सिंह म्हणाले की, चांद्रयान-3 मोहीम चंद्रावरील वातावरण, मृदा, खनिजे इत्यादींची माहिती आपल्याकडे मायदेशी पाठवण्याची अपेक्षा आहे, जी कदाचित जगभरातील वैज्ञानिक समुदायासाठी पूर्णपणे नवीन असेल आणि आगामी काळात दूरगामी परिणाम करणारी असेल.विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांनी मोहिमेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नियोजित कार्यक्रमानुसारच काम सुरू केले आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
सिंह पुढे म्हणाले की, चांद्रयान-3 वर असलेल्या शास्त्रीय उपकरणांचा (पेलोड्स) मुख्य भर चंद्राच्या पृष्ठभागाच्या वैशिष्ट्यांचे एकात्मिक मूल्यमापन करण्यावर राहील, ज्यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागावरील खडकांच्या वरच्या थरातील मृदेचे(रिगोलिथ) औष्णिक गुणधर्म आणि पृष्ठीय संयुगे याबरोबरच पृष्ठभागाजवळचे प्लाझ्मा( द्रवरुप आणि घनरुप) पर्यावरण यांचा समावेश आहे. चंद्राच्या पृष्ठभागाजवळ असलेल्या पर्यावरणाचे मूलभूत आकलन करण्यासाठी आणि भविष्यातील संशोधनासाठी चंद्रावर वसतिस्थान उभारण्यासाठी हे सर्व अतिशय गरजेचे असल्याचेही डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
विक्रम लँडरवर भूकंपमापकयंत्र(ILSA), प्लाझ्मा पर्यावरणाच्या औष्णिक आणि भौतिक गुणधर्मांचा अभ्यास करणारे (चंद्राज सर्फेस थर्मोफिजिकल एक्सपरिमेंट [ChaSTE]) उपकरण, लँगमुईर प्रोब(RAMBHA-LP) आणि लेझर रिट्रोरिफ्लेक्टर ही वैज्ञानिक उपकरणे आहेत तर प्रज्ञान रोव्हरवर अल्फा पार्टिकल एक्स रे स्पेक्ट्रोमीटर आणि लेझर आधारित ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप ही उपकरणे आहेत. या सर्व उपकरणांचा वापर २४ ऑगस्टपासून ही मोहीम संपेपर्यत सातत्याने सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.
चंद्रावरील भूगर्भीय हालचालींची नोंद घेण्याचे, त्याबरोबरच चंद्राच्या पृष्ठभागावर परिणाम करणाऱ्या उल्कापाताच्या परिणामांची माहिती घेण्याचे काम भूकंपमापकयंत्र(ILSA) सातत्याने करेल. या मापनामुळे आपल्याला या पृष्ठभागावर भावी काळात वसतिस्थान उभारण्यासाठी तिथे किती प्रमाणात उल्कावर्षाव होतो किंवा भूकंप होतात याचे आकलन होऊन संभाव्य धोक्यांची माहिती मिळेल, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.
या लँडर आणि रोव्हरचे आयुष्य एक चांद्रदिवस म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवसांइतके असल्याने त्यानंतर त्यांचे काम बंद होण्याच्या निद्रास्थितीत (हिबरनेशन) ते जातील. तरीही एका चांद्ररात्रीनंतर म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवसांनंतर इस्रोचे वैज्ञानिक या दोन्ही अंतराळवाहनांमध्ये तेथील अति शीत रात्रींच्या तापमानातून तग धरून पुन्हा काम करण्याची ऊर्जा त्यांच्यात शिल्लक आहे का आणि शिल्लक राहिलेल्या बॅटरीच्या मदतीने आणि सौर पॅनेल ऑन करून ती पुन्हा सुरू होतील का याची चाचपणी करतील, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, इस्रो आता ७ शास्त्रीय उपकरणांसह(पेलोड्स) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक(PSLV) च्या मदतीने आदित्य-एल-1 मिशन ही मोहीम सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राबवण्याच्या तयारीत आहे. आदित्य- एल1 ही मोहीम अंतराळातून सूर्याचे अध्ययन करणारी भारताची पहिली मोहीम ठरेल. गगनयान ही भारताची मानवी अंतराळ मोहीम ही इस्रोची यापुढील सर्वाधिक महत्त्वाकांक्षी मोहीम असेल, असे डॉ, जितेंद्र सिंह यांनी सांगितले. मानवाला अंतराळात पाठवण्यापूर्वी किमान दोन मोहिमा राबवल्या जातील, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर गेल्या ९ वर्षात अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर पायाभूत सुविधा विकासाच्या क्षेत्रात करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. २०१३ पर्यंत वर्षाला सरासरी ३ प्रक्षेपण मोहीमा या गतीने ४० अंतराळ प्रक्षेपण वाहन मोहिमा राबवण्यात आल्या होत्या. गेल्या ९ वर्षात ५३ प्रक्षेपण वाहन मोहिमा म्हणजे दुप्पट मोहिमा राबवण्यात आल्या असे त्यांनी सांगितले.
चांद्रयान-3 च्या चंद्रावर अवतरण प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी लोकांचा प्रचंड प्रतिसाद विचारात घेऊन पुढील महिन्यात इस्रो देशभरात विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांना एकत्र आणून एका जागरुकता मोहिमेचा प्रारंभ करणार आहे, अशी माहिती डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. एकाच वेळी ८० लाखांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी चांद्रयान-3 लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचे प्रक्षेपण पाहिल्यामुळे, ही घटना म्हणजे यूट्युबवरील लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे सर्वात मोठ्या संख्येने पाहिली गेलेली घटना ठरली आहे.
इस्रोच्या जागरुकता अभियानाची सुरुवात १ सप्टेंबरपासून होणार आहे आणि यामध्ये फ्लॅशमॉब्ज, मेगा टाऊन हॉल्स, प्रश्नमंजुषा आणि बेस्ट सेल्फीज अशा स्पेस स्टार्टअप्स आणि टेक पार्टनर कंपन्यांवर भर देणाऱ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कार्यक्रमांचा समावेश असेल असेही त्यांनी सांगितले.
ISRO will launch this campaign across the country for students and general public
ISRO Big Nationwide Campaign Announcement Space Awareness