वॉशिंग्टन – अमेरिकेच्या दडपणापुढे इस्राईलला झुकावे लागले आहे आणि गेल्या ११ दिवसांपासून गाझापट्टीवर सुरू असलेले युद्ध थांबविण्यासाठी तो तयार झाला आहे. अमेरिकेत व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जेन साकी यांनी हा घटनाक्रम उत्साहजनक असल्याचे म्हटले आहे.
इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सिक्युरिटी कॅबिनेटमध्ये या निर्णयाला मंजुरी प्रदान करण्यात आली. हमासचे एका मुख्य कमांडरने शुक्रवारपर्यंत युद्धविराम होण्याची शक्यता वर्तवली होती. ते म्हणाले होते की, ‘मला वाटतं संघर्ष विरामासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. मला आशा आहे की आपसातील सहमतीवरून एक–दोन दिवसांमध्ये संघर्ष विराम होण्यासाठी करार होऊ शकतो.’
मिस्रमधील सूत्रांनी मध्यस्थ देशांच्या मध्यस्थीने संघर्ष विरामावर सहमती झालेली आहे, असे आधीच सांगितले होते. यापूर्वी गुरुवारी इस्राईलने गाझापट्टीमध्ये हमासवर जोरदार हल्ला चढवला. यात एका फलस्तीनी नागरिकाचा मृत्यूही झाला आणि अनेक लोक जखमी झाले. इस्राईलच्या सेनेने सांगितले की गाझाच्या खान युनिस आणि राफह परिसरांमध्ये हमासच्या तीन कमांडरांच्या घरांना लक्ष्य करण्यात आले. याशिवाय एक सैनिक तळ आणि शस्त्र भंडारही लक्ष्य करण्यात आले.
उत्तर गाझामध्ये शरणार्थींच्या शिबीरावर हल्ला
खान युनिसमध्ये एका दोन मजली इमारतीला उध्वस्त करण्यात आले. या भागात राहणाऱ्या एका व्यक्तिने सांगितले की इमारतीच्या बाहेर उभे असलेले ११ नागरिक जखमी झाले. ते हल्ल्यांच्याच भितीने बाहेर झोपले होते. याशिवाय आणखी एका घरावर झालेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आणि तीन इतर लोक जखमी झाले.
उत्तर गाझामध्ये शरणार्थींच्या शिबिरावरही हल्ला चढविण्यात आला. इस्राईलच्या सेनेने सांगितले की शिबिरात दोन भूमिगत लॉन्चर होते. तेल अव्हीववर रॉकेट हल्ल्यांसाठी याचा वापर केला जात होता.