जेरुसलम – इस्त्रायलमध्ये लोकांच्या चेह वर मास्क नव्हे, तर हास्य उमटत असल्याचे छायाचित्रे व्हायरल झाल्याने यातून सुटका होण्याची आशा इतर देशांमध्येही निर्माण झाली आहे. जवळपास ८१ टक्के लोकांचे लसीकरण केल्यानंतर इस्त्रायलने घराबाहेर पडताना मास्क वापर्याचा निर्बंध हटविला आहे, त्यामुळे बहुतेक सर्व लोकांनी मास्क वापरणे सोडून दिले आहे. मास्कचे निर्बंध हटविण्याचा आदेश देणारा इस्त्रायल जगातील पहिला देश ठरला आहे.
२०१९ च्या अखेरीस चीनमधून इतर देशांमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूने लाखो लोकांचा जीव घेतलेला आहे. तसेच अनेक देशांची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. त्याशिवाय लोकांना खबरदारी म्हणून तोंडाला मास्क लावण्याशिवाय पर्याय उरला नाही. इस्त्रायलने उत्तम नियोजन करुन कोरोनावर मात केली आहे.
इस्त्रायलमध्ये १६ वर्षांहून अधिक वयाच्या ८१ टक्के लोकांना कोरोनाचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर कोरोनारुग्णसंख्येत वेगाने घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. परदेशी नागरिक आणि लसीकरण न केलेल्या लोकांना प्रवेश मर्यादित करण्यात आले असून, देशात येताच त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात येत आहे.
देशात नव्या भारतीय ट्रेनचे सात रुग्ण आढळले आहेत. त्यांची तपासणी सुरू आहे, असे इस्त्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. कोरोना रुग्णसंख्येत घट होत असलेल्या देशांचे आम्ही नेतृत्व करत आहोत. ही लढाई सुरूच राहणार आहे. कारण कोरोना पुन्हा कधीही येऊ शकतो, असे इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले.
एका वर्षापूर्वी घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले होते, परंतु आता या आदेशाला मागे घेण्यात आले आहे. सभागृह, मैदाने किंवा इन्डोअर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे गरजेचे आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. “इस्त्रायल हायोम” म्हणजेच “स्वातंत्र्याने श्वास घेत आहोत”, असा मथळा छापत इस्त्रायलच्या सर्वात मोठ्या वृत्तपत्राने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
एक कोटीहून कमी लोकसंख्या असलेल्या इस्त्रायलमध्ये आतापर्यंत एकूण ८,३७,१६० लोक कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यात ६,३३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात तिथे फक्त ११३ रुग्ण आढळले आहेत. ८,२८,५५२ लोक पूर्णपणे बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णसंख्या २,२७० आहे.