विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धाला पुर्णविराम मिळाला असला तरी तब्बल ११ दिवस चाललेल्या या युद्धातील अनेक बाबी आता समोर येत आहेत. इस्त्राईलकडे जगातील सर्वात अत्याधुनिक अशी संरक्षण प्रणाली आहे. त्यातीलच एक म्हणजे हवेतच रॉके उद्धवस्त करण्याची यंत्रणा. मिसाईल एअर डिफेन्स सिस्टीम अशी ओळख असलेल्या या नव्या तंत्रज्ञानाचे सर्वांनाच आकर्षण आहे. ते जाणून घेऊया…
९० टक्के प्रभावी
इस्राईलच्या या नव्या एअर डिफेन्स सिस्टीमला आयरन डोम म्हटले जाते. इस्राईलच्या सेनेचा दावा आहे की त्यांची आयरन डोम सिस्टीम शत्रूंच्या ९० टक्के मिसाईल्सला हवेतच उध्वस्त करू शकतात. ही एअर डिफेन्स सिस्टीम शत्रूंच्या ड्रोनलाही नेस्तनाबूत करते.
जगातील सर्वोत्तम सुरक्षा यंत्रणा
इस्राईलची कंपनी राफेल एडव्हान्स सिस्टीम आणि इस्राईल एअरोस्पेस इंडस्ट्रीने या एयर डिफेन्स सिस्टीमची निर्मिती केली आहे. आयरन डोम एयर डिफेन्स सिस्टीमला जगाने एखाद्या लोखंडाची उपमा दिली आहे. ही जगातील सर्वोत्तम सुरक्षा यंत्रणा आहे. कोणत्याही मोसमात शत्रूवर मात करण्यात ही यंत्रणा सक्षम आहे.
असा झाला निर्मितीचा प्रारंभ
२००६ मध्ये लेबनानच्या हिजबुल्लाहसोबत इस्राईलचे युद्ध झाले. त्या युद्धात इस्राईलवर हजारो रॉकेट सोडण्यात आले. त्यातून धडा घेत इस्राईलने एक अॅडव्हान्स एयर डिफेन्स सिस्टीम बनविण्याची घोषणा केली होती.
२०११ ला सैन्यात सामील
या अॅडव्हान्स एअर डिफेन्स सिस्टीमच्या निर्मितीत इस्राईलने मित्र राष्ट्र अमेरिकेचीही मदत घेतली आणि वेगाने काम करीत ही यंत्रणा विकसित केली. इस्राईल वर्ष २०११ पासूनच आपल्या नागरिकांची या सिस्टीमद्वारे सुरक्षा करीत आहे.
अशी आहे यंत्रणा
ही एक ग्राऊंड–टू–एयर डिफेंस सिस्टीम आहे. यातील रडार शत्रूच्या मिसाईलची माहिती देतो आणि ते कुठे पडू शकते हेदेखील सांगते. त्यानंतर इंटरसेप्टर मिसाईल कार्यान्वित होतात आणि हवेतच शत्रूंचे मिसाईल उध्वस्त करतात.