नवी दिल्ली – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आयएसआय या गुप्तचर संस्थेचे प्रमुख फैज हमीद यांना पदावरून हटविण्यात आले आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख चीफ जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी असलेले मतभेद आणि परवानगी न घेता काबूलला गेल्याने त्यांचे पद काढून घेण्यात आल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. फैज हामीद यांच्या काबूल भेटीमुळे नाराज झालेल्या अमेरिकेला खूश करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचेही बोलले जात आहे. पाकिस्तानचे लष्कर आणि सरकार तालिबानला सहकार्य करत असल्याचा आरोप लावण्यात आला होता. अमेरिकेची यात काय भूमिका होती हे जाणून घेऊयात.
अमेरिकेच्या आडून बाजवांची चाल
जाणकार प्रा. हर्ष व्ही. पंत सांगतात, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बाजवा आणि फैज यांच्यात सुरू असलेल्या वादाची परिणिती त्यांचे पद जाण्यात झाली. फैज हे पंतप्रधान इम्रान खान यांचे लाडके आहेत. त्यांना हटविण्यासाठी बाजवा ठोस कारणाच्या शोधात होते. अफगाणिस्तानातून अमेरिकी सैनिक माघारी गेल्यानंतर फैज यांनी काबूल दौरा केला होता. ही सुवर्णसंधी साधून बाजवा यांनी फैज यांना हटविले. फैज यांच्या काबूल दौर्याचा अमेरिकेने कडवा विरोध केला होता. तालिबानचे सरकार स्थापन करण्यात पाकिस्तान प्रमुख भूमिका बजावत असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. पाकिस्तानला अशी कृती करणे महागात पडू शकते, असा इशाराही अमेरिकेने दिला होता. पाकिस्तान आणि तालिबानमधील संबंधांबाबत अमेरिकी सिनेटमध्ये एक विधेयक दाखल करण्यात आले आहे. या विधेयकामुळे पाकिस्तान चवताळला आहे.
अफगाणिस्तानमध्ये पार्टीत सहभागी
काबूलमधील सेरेना हॉटेलमध्ये तालिबानी नेत्यांसोबत एका पार्टीत फैज सहभागी झाले होते, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. तालिबानचे सरकार स्थापन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती असाही आरोप त्यांच्यावर आहे. इम्रान खान यांचे निकटवर्तीय असल्याने फैज हे लष्कर प्रमुखपदाचे दावेदार होते. फैज यांना आयएसआयप्रमुख पदावरून हटवून पेशावर येथील कार्प्स कमांडरपदी पाठविण्यात आले. पाकिस्तानमध्ये यावरून राजकारण सुरू झाले आहे. अमेरिकेच्या दबावामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
बाजवा-फैज मतभेद
लष्करप्रमुख बाजवा आणि फैज यांच्यादरम्यान तीन वर्षांपासून मतभेद होते. रावळपिंडी येथील लष्कराच्या एका गृहप्रकल्पावरून दोघांमध्ये मतभेदाची ठिणगी पडली होती. इम्रानचे निकटवर्तीय असल्याने बाजवा यांना तीन वर्षांची मुदत वाढवून देण्यात आली. ही चढाओढ सर्वांसमोर आले होते. मतभेदानंतर फैज यांनी अनेक वेळा बाजवा यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले होते.