नवी दिल्ली – राजस्थानमधील पोखरण येथे पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या आरोपीला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. बिकानेर येथील रहिवासी हबिब खान (४८) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला आधी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करण्यासह भारतीय लष्कराशी संबंधित गोपनीय कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचा आरोप संशियतावर आहे. पोखरण येथील शिबिरातील भारतीय लष्कराच्या अधिकार्याकडून आरोपीने गोपनीय कागदपत्रे घेतले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. लष्करातील आणखी काही लोक व कर्मचार्यांचा यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.
संशयित आरोपी हबीब खान खूप दिवसांपासून पोखरण येथे राहात होता. ठेकेदार म्हणून तो लष्करात काम करत होता. पोखरण परिसरातील इंदिरा स्वयंपाकगृहात भाज्यांचा पुरवठा करण्याचा ठेका त्याच्याकडे होता, असे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडे लष्कराच्या परिसरात भाज्या पुरवठा करण्याचा ठेका होता. त्यामुळे तो लष्कराच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू शकला. काही महिन्यांपूर्वी तो लष्कराच्या तपासाच्या क्षेत्रात आला होता.
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक पोखरण, जैसलमेर येथे पोहोचल्यानंतर हबीब खान याला मंगळवारी ताब्यात घेतले होते. आयएसएयच्या लोकांना भेटून संशयित खान कागदपत्रे देत होता. त्याबदल्यात त्याला आयएसआयकडून पैसेही मिळाले होते.
चौकशीदरम्यान हबीबने दोन-तीन लोकांची नावे उघड केली आहेत. दिल्ली पोलिसांसह लष्करी अधिकार्यांनी अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. हबीब खान हेरगिरी करणार्या टोळीचा एकमेव सदस्य असल्याची माहितीही गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी दिली. बुधवार रात्रीपर्यंत अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. ऑपरेन पूर्ण होताच याबाबत माहिती दिली जाणार आहे.