इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या ईश्वरी सावकारने महाराष्ट्रातर्फे तेवीस वर्षांखालील महिला क्रिकेट संघातर्फे खेळताना पुदुचेरी वरील विजयात शानदार नाबाद शतक झळकवले. ईश्वरी सावकारने ११७ चेंडूत ९ चौकरांसह नाबाद ११५ फटकावत आपल्या जोरदार फलंदाजीची चमक दाखवली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे २३ वर्षांखालील महिलांसाठी एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा चंदीगड येथे सुरू झाली आहे. यात पहिल्या साखळी सामन्यात पुदुचेरी संघाविरुद्ध महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या ईश्वरी सावकारच्या नाबाद ११५ धावांच्या जोरावर ५० षटकांत ३ बाद २९३ धावा केल्या. तिला ईश्वरी अवसरे ८४ व भाविका अहिरे ४७ धावा यांची साथ मिळाली. विजयासाठी २९४ धावांचा पाठलाग करताना पुदुचेरीला ७ बाद १७३ इतकीच मजल मारता आली. इशिता खळेनी ३ व गायत्री सुरवसेनी २ बळी घेत महाराष्ट्र संघाला १२० धावांनी मोठा विजय मिळवून दिला.
पुढील सामना – ७ मार्च – नागालँड .