नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारची महाराष्ट्राच्या २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयतर्फे २३ वर्षांखालील महिलांसाठी चंदिगड येथे ५ ते १३ मार्च दरम्यान महाराष्ट्र संघाचे एकदिवसीय साखळी सामने होणार आहेत.
सलामीची फलंदाज ईश्वरी विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. ईश्वरी सावकार वेळोवेळी विविध वयोगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सलामीला येत आपल्या धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन करत असते. ईश्वरी सावकारची मागील हंगामात १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली होती. महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय आयोजित, राष्ट्रीय पातळीवरील १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी देखील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे ईश्वरी सावकारची कर्णधारपदी निवड कायम ठेवण्यात आली होती व तिच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय स्पर्धेत महाराष्ट्र संघ उपान्त्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता.
नोव्हेंबर २०२२ मध्ये श्रीलंका, वेस्ट इंडीज , इंडिया ए व इंडिया बी यांच्या चौरंगी मालिकेत ईश्वरीने इंडिया बी संघातर्फे फलंदाजीतील चमक दाखवली होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये १९ वर्षाखालील चॅलेंजर ट्रॉफीत देखील ईश्वरी सावकारची निवड झाली होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये , ईश्वरी सावकारला, २०२२-२३ च्या हंगामात १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाची कर्णधार असताना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – एम सी ए- चे २०२२ वर्षा साठीचे सर्वोत्कृष्ट – बेस्ट – क्रिकेटपटूचे पारितोषिक मिळाले होते. राष्ट्रीय पातळीवरील महिला एकदिवसीय सामन्यांच्या डेहराडून येथे खेळल्या गेलेल्या स्पर्धेत घणाघाती दिडशतक झळकवत अफलातून फलंदाजीचे प्रदर्शन घडवले होते.
नाशिकच्या महिला क्रिकेटपटूने प्रथमच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – आयोजित राष्ट्रीय पातळीवरील महिला स्पर्धेत कर्णधारपद भूषवत असे शतकच नव्हे तर दिडशतक झळकवत ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यावेळी ईश्वरीची १९ वर्षांखालील भारतीय संघातील निवडीची संधी अगदी थोडक्यात हुकली होती. यंदा जानेवारीत बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील महिलांसाठी टी-ट्वेंटी सामन्यांची स्पर्धेत रायपूर येथे, ईश्वरीने गोवावरील विजयात आपल्या जोरदार फलंदाजीची चमक दाखवत नाबाद ९१ धावा फटकवल्या.
गेल्या तीन वर्षांपासून बीसीसीआय – तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील एन सी ए कॅम्प तसेच हाय परफॉरमन्स शिबिरासाठी ईश्वरीची निवड होत आहे. माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , होतकरू खेळाडूंसाठी हे शिबीर झाले. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व जवळपास सर्वच वयोगट व वरिष्ठ महिला संघातर्फे देखील करतांना , विविध स्पर्धेतील लक्षणीय कामगिरीच्या जोरावर ईश्वरी सावकारची हि निवड होत आली आहे. ईश्वरी सावकारची वरिष्ठ महिला क्रिकेट संघात टी-ट्वेंटी चॅलेंजर ट्रॉफी साठी निवड झाली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे १७ ते २७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान रांची, झारखंड येथे वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.तर नवी दिल्ली येथे ४ ते १६ डिसेंबर २०२४ दरम्यान , बीसीसीआय तर्फे वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत, महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
५ ते १३ मार्च दरम्यान , चंदिगड येथे २३ वर्षांखालील महिलांसाठी महाराष्ट्राचे एकदिवसीय साखळी सामने पुढील प्रमाणे होणार आहेत :
५ मार्च – पुदुचेरी , ७ मार्च – नागालँड , ९ मार्च – दिल्ली , ११ मार्च – बंगाल व १३ मार्च – गुजरात .
ईश्वरी सावकारच्या ह्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ईश्वरीचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.