नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हं. प्रा.ठा. महाविद्यालयात शिकणारी नाशिकची एनसीसी कॅडेट इशिता हेमंत खोंड हिची नवीदिल्लीत कर्तव्यपथ (राजपथ) येथे २६ जानेवारीला होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी निवड झाल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एनसीसी एअर विंगमधून महाराष्ट्रातून एकमेव म्हणजे इशिताची निवड झाल्याने नाशिककर आणि जिल्ह्याच्यादृष्टीने ती खूपच अभिमानास्पद बाब आहे. चार महिन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर वेगवेगळ्या चाचण्यांना यशस्वीरित्या सामोरे जात तिने हा बहुमान पटकाविल्याने तिचे यश खुलून दिसते. त्यामुळे तिचे करावे तितके कौतुक थोडे आहे. तिला बिटको कॉलेजच्या एनसीसी अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशात तिच्या आई आणि वडिलांचेही भरीव योगदान आहे. तिचे वडील हेमंत खोंड हे ख्यातनाम उद्योजक तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी आहेत. एअर विंगमधून संपूर्ण भारतभरातून फक्त बारा मुलींची संचलनासाठी निवड झाली आणि त्यापैकी इशिता ही एक आहे हे विशेष.दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत या सर्वांचे प्रशिक्षण पहाटे पाचपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू असते. वायुदलात जाऊन मोठे अधिकारी होण्याचे इशिता चे स्वप्न आहे.