नवी दिल्ली – सोशल मीडिया हा इंटरनेटवरील वणवा आहे. एखादी बातमी किंवा माहिती खरी-खोटी याची पडताळणी न करता ती पुढे पाठविली जाते. अशा बातम्यांचे समाजावर विपरित परिणाम होतात. त्यामुळे कुठलीही माहिती पुढे पाठविण्याआधी तिची पडताळणी करणे गरजेचे आहे.
सोशल मीडियावर सध्या ५०० रुपयांच्या नोटेबाबत एक बातमी चांगलीच व्हायरल होत आहे. ५०० रुपयांच्या नोटेवर आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ असलेली हिरवी पट्टी महात्मा गांधी यांच्या फोटोजवळ असेल तर ती नोट स्वीकारू नये, असा दावा व्हायरल बातमीमध्ये केला जात आहे.
केंद्र सरकारने या दाव्याचे खंडन केले असून, ही अफवा असल्याचे म्हटले आहे. दोन्ही प्रकारच्या नोटांना मान्यता आहे. सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेला दावा खोटा आहे, असे पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
चलनाबाबत अशा प्रकारचे दावे प्रथमच करण्यात आलेले नाहीत. या आधीसुद्धा असे दावे करण्यात आले आहेत. यामध्ये ५, १०, १०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार आहेत, अशी बातमी सोशल मीडियावर आगीप्रमाणे पसरली होती. तेव्हाही पीआयबीने या वृत्ताचे ट्विट करून खंडन केले होते. आरबीआयकडून अशी घोषणा करण्यात आलेली नाही. ५, १०, आणि १०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद होण्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत, असे पीआयबीने म्हटले होते.