मुंबई – राज्यातील जनतेसाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार आज राज्याला मोठी भेट देण्याची चिन्हे आहे. राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला आहे. दुसरी लाट जवळपास ओसरत आली आहे. आणि त्याचाच आढावा घेण्यासाठी आज राज्य टास्क फोर्सची बैठक होत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत राज्यातील कोरोना निर्बंधांचाही फेरविचार केला जाणार आहे. सरकारने बहुतांश निर्बंध शिथील केले आहेत. मात्र, सद्यस्थिती आणि आगामी काळाचा वेध लक्षात घेऊन सर्व निर्बंध पूर्णपणे हटवायचे की काही प्रमाणात लागू ठेवायचे याचा निर्णय या बैठकीत होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती, लसीकरणाची आकडेवारी हे सुद्धा तपासले जाईल. शिवाय सध्या लसीचा तुटवडा नाही. मुबलक प्रमाणात लस उपलब्ध आहे. तसेच, लसीकरणाचा वेगही वाढविण्यात आला आहे. त्यामुळे यापुढील काळात किमान एक डोस घेतलेल्यांनाही अनेक ठिकाणी सवलत मिळण्याची चिन्हे आहेत. या सर्व बाबींचा विचार टास्क फोर्सच्या बैठकीत केला जाणार आहे. परिणामी, दोन आठवड्यांनी होत असलेल्या दिवाळी सणाच्या तोंडावर ठाकरे सरकारकडून निर्बंध शिथीलतेविषयी मोठा निर्णय घेऊन त्याची घोषणा होण्याची दाट चिन्हे आहेत. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.