नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात ओमिक्रॉनबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. विविध राज्ये यावर ताबा मिळविण्यासाठी रात्रीच्या संचारबंदीपासून शाळा-महाविद्यालये बंद करण्यासारख्या उपाययोजना करत आहेत. परंतु ह्या उपाययोजना खरोखरच प्रभावी आहेत का? यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) मत खूपच वेगळे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या, की रात्री संचारबंदी लावण्यावर कोणताही वैज्ञानिक आधार नसून, ती किती प्रभावी आहे याचे कोणतेही पुरावे नाहीत.
एका मुलाखतीत सौम्या स्वामिनाथन बोलत होत्या. सौम्या स्वामिनाथन सांगतात, कोविडचा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालणे आणि लसीकरण करून घेणे अधिक सहाय्यक ठरेल. ९० टक्के लोकसंख्येने पूर्णवेळ मास्क घातला, तर कोरोनाचा फैलाव खूप अंशी कमी होऊ शकतो. त्यावर आम्हाला अधिक लक्ष देण्याची गरज आहे. परंतु आरोग्याशी संबंधित कोविडच नव्हे, तर त्याच्याशी संबंधित अनेक घटक आपले आयुष्य प्रभावित करतात. यावरही लक्ष देण्याची गरज आहे.
लॉकाडाउन आणि कोरोना निर्बंधांविषयी स्वामिनाथन सांगतात, की कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राजकीय नेत्यांनी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करण्याबाबत विचार करण्याची गरज आहे. नागरिकांच्या त्रासांसह याचे संतुलन ठेवणे आवश्यक आहे. आधीच्या लॉकडाउनमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आणखी नुकसान झेलण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे आर्थिक व्यवहार खुले ठेवण्याची आवश्यकता आहे. शाळा बंद करण्याचा सर्वात शेवटचा उपाय असू शकतो. आणि जर शाळा खुल्या करायच्या असल्यास त्या सर्वप्रथम उघडल्या जाव्यात. जास्त काळ शाळा बंद ठेवल्यामुळे मुलांवर आणि त्यांच्या शिक्षणावर वाईट परिणाम होणार आहेत.
बूस्टर डोसबद्दल स्वामिनाथन सांगतात, की बूस्टर डोस हा माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच्या यंत्रणेला बळकट करण्यास मदत करतो. बूस्टर डोसमुळे मेमरी पेशी सक्रिय होतात. बूस्टर डोस म्हणून तुम्ही कोणती लस निवडता हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. जसे की तुम्ही कोणत्या देशात आहात, तिथे कोणती लस देण्यात आली, त्या देशात कोणत्या लशीचा पुरवठा चांगला आहे, त्यावर किती खर्च होत आहे. परंतु कोणतीही लस असो, ती शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्यास मदत करते.