विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट मोठे संकट घेऊन आली आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. त्यामध्ये कोरोना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना ऑक्सिजनऐवजी नेब्युलायझरचा वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सर्वोदय रुग्णालयाचे डॉक्टर आलोक हे कोरोना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना ऑक्सिजनऐवजी नेब्युलायझर वापरण्याचा सल्ला देताना दिसत आहे. एवढेच नव्हे, ते प्रयोगही करून दाखवत आहे. आपल्या वातावरणात पुरेसा ऑक्सिजन आहे. त्याचा नॅब्युलायझर मशीनद्वारे वापर करू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.
नेब्युलायझर बाजारात सहज उपलब्ध होते. दरम्यान, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वातावरणातून ऑक्सिजनची कमतरता भरून काढू शकतो या विचारातून अनेक लोक निश्चिंत झाले आहेत. परंतु संबंधिताने केलेला हा दावा चुकीचा आणि बनावट आहे.
रुग्णालयांकडून इशारा
ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी नॅब्युलायझरच्या प्रयोग दाखविणारा हा व्हिडिओ चुकीचा असल्याचे सर्वोदय रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. हा व्हिडिओ कोणत्याही वैज्ञानिक अभ्यासाच्या आधारावर नाहीये. तसेच असा कोणताही वैद्यकीय सल्ला देण्यात आलेला नाही, असे रुग्णालयाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हा दावाच सर्वोदय रुग्णालयाने फेटाळून लावला आहे. अशा प्रकरचे प्रयोग डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करून नये असे आवाहनही करण्यात आले आहे.
संबंधित डॉक्टरकडून खुलासा
डॉ. अलोक यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामध्ये ते म्हणतात, त्यांच्याकडून चुकीचा मेसेज चालविला गेला आहे. ऑक्सिजन सिलिंडरच्या ऐवजी नेब्युलायझर मशीनचा वापर करणे चुकीचे आहे. हा योग्य पर्याय नाहीये. मी वेगळे काही सांगू इच्छित होतो मात्र योग्य शब्दांचा वापर न केल्याने लोकांपर्यंत चुकीचा संदेश गेला, असा खुलासा त्यांनी केला आहे.