नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १०८ वी भारतीय विज्ञान काँग्रेस यंदा नागपुरात आयोजित करण्यात आली. महाराष्ट्राच्या उपराजधानीत तब्बलल ४० वर्षांनंतर हे आयोजन झाले. भारतीय विज्ञान काँग्रेस आणि प्राईड अॉफ इंडिया प्रदर्शन या दोन्हींना विद्यार्थी व अभ्यासकांची चांगली गर्दी होती. विज्ञानात रस असलेल्या सामान्य नागरिकांनीही इथे हजेरी लावली. पण तरीही इतिहासात प्रथमच देशाच्या पंतप्रधानांनी विज्ञान काँग्रेसला प्रत्यक्ष हजेरी लावली नाही, याची चर्चा अधिक होत आहे.
भारतीय विज्ञान काँग्रेसची स्थापना १९१४ मध्ये झाली. देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय पंतप्रधानांच्याच हस्ते याचे उद्घाटन होत आहे. यावेळी ४० वर्षांनी नागपूरला यजमानपद मिळाल्यामुळे नागपुरात एक वेगळा उत्साह होता. पण उद्घाटनाला पंतप्रधान येणार नाही म्हटल्यावर आश्चर्य व्यक्त करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने उद्घाटन केले आणि भाषण केले. केवळ भारतातील नाही तर जगभरातील विज्ञानविश्वाचे भारतीय विज्ञान काँग्रेसकडे लक्ष असते. त्यामुळे पंतप्रधानांची उपस्थिती राहील, असे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. खरं तर पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींचे निधन चार दिवसांपूर्वीच झाले होते, त्यामुळे ते येणार नाही, अशी चर्चा होती. पण अंत्यसंस्कारानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ते कामाला लागले, त्यामुळे पंतप्रधान नागपुरात येतील, अशी आशा होती. शिवाय ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गासह इतर चार प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नागपुरात होते. त्यामुळे लगेच एक महिन्याच्या आत पुन्हा येतील की नाही, अशीही शंका होती.
हळदीकुंकवावरुन वाद
महिला विज्ञान काँग्रेससाठी आलेल्या महिला शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांचे हळदीकुंकू लावून स्वागत करण्यात आले. तसेच, याठिकाणी रांगोळीही काढण्यात आली. रांगोळीमुळे अशुभ गोष्टी येत नाहीत असा दावाही करण्यात आला. विज्ञान काँग्रेसमध्ये अंधश्रद्धा पसरविण्यात आल्याने त्याची देशभऱात मोठी चर्चा झाली.
यजमानपद विद्यापीठाकडे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली हे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे शतक महोत्सवी वर्ष म्हणून भारतीय विज्ञान काँग्रेसचे आयोजनही विद्यापीठाच्या भव्य परिसरात करण्यात आले. खरं तर विद्यापीठाने जागा उपलब्ध करून देण्यापलीकडे कुठलाही आर्थिक हातभार यासाठी लावलेला नाही. ते शक्यही नव्हते, कारण वर्षभरापूर्वी शतक महोत्सव दणक्यात साजरा करणार, अश्या बाता मारणाऱ्या विद्यापीठाने एकही कार्यक्रम धड घेतलेला नाही. अश्यात हा आयता कार्यक्रम मिळाल्याने थोडक्यात निभावले.
आयोजन पुण्यात होणार होते
भारतीय विज्ञान काँग्रेसचे आयोजन सिम्बॉयसीस पुणे येथे होणार होते. त्यानुसार तयारी झाली. सोशल मिडियासाठी कॉन्टेंट उभा करण्यात आला. आणि काही दिवसांपूर्वी पुण्याऐवजी नागपूरचे नाव घोषित झाले. त्यामुळे स्थानिक आयोजकांना कमी वेळात मोठा डोलारा उभा करावा लागला. त्यादृष्टीने हे आयोजन आव्हानात्मक होते.
27 परिसंवादांचे आयोजन
विज्ञानप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या या परिषदेत एकूण 27 परिसंवादांचे आयोजन करण्यात आले. सर्वच विषयांवर सखोल चर्चा झाली. अनेक दिग्गजांचा यात सहभाग होता. भारताची 2030 मधील वाटचाल,अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान, कोविड आजारानंतर दिसून येणारे परिणाम, कर्करोग, पुरुष प्रजनन संदर्भातील संशोधन यासह विविध विषयांवर परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. देश -विदेशातील अनेक संशोधक, वैज्ञानिक या परिषदेत सहभागी झाले होते.
बाल विज्ञान प्रदर्शन
बाल विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ‘निरी’चे माजी संचालक डॉ.सतीश वाटे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभामंडपात हे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. 10 ते 17 वर्षे वयोगटातील बालवैज्ञानिकांचे विविध प्रयोग येथे प्रदर्शित करण्यात आले आहेत. देशभरातील सर्वच भागातून आलेल्या बालकांची या प्रदर्शनाला उपस्थिती लावली .
महिला विज्ञान काँग्रेस
महिला विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले. विज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत विकासाचे ध्येय प्राप्त करण्यात महिलांचे योगदान महत्वपूर्ण आहे. महिलांनो आता स्वयंस्फूर्तीने विज्ञानक्षेत्रात भरारी घ्या आणि आकाश कवेत घ्या, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनीही आपले विचार यारदम्यान व्यक्त केले. असंख्य वाटचालींवर मात करीत केलेली वाटचाल त्यांनी यावेळी कथन केली.
प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन
भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. शहीद बिरसा मुंडा सभागृहात आदिवासी विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांच्या हस्ते झाले. भारतीय विज्ञान काँग्रेसचे महासचिव डॉ.ए. रामकृष्ण, नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे,अधिष्ठाता डॉ. राजू हिवसे आणि आदिवासी विज्ञान काँग्रेसचे संयोजक डॉ.श्याम कोरेट्टी मंचावर उपस्थित होते. आदिवासींनी विकसित केलेल्या तंत्राचा उपयोग शेती आणि औषध निर्मिती क्षेत्रात व्हावा, असा या आदिवासी विज्ञान काँग्रेसमधील सूर होता.
शेतकरी विज्ञान काँग्रेस
देश धान्य उत्पादनात खुप पुढे गेला आहे. यामागे शेतकऱ्यांची फार मोठी मेहनत आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फार सुधारली नसल्याचे दिसून येते. शेती व्यवसायाच्या प्रगतीसाठी आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्वाचा आहे. शेतकऱ्यांनी बाजारतंत्रही अवगत करणे आवश्यक असल्याचा शेतकरी विज्ञान काँग्रेस परिषदेतील सूर होता.
‘प्राईड इंडिया एक्सपो’ विशेष आकर्षण
प्राईड इंडिया एक्सपो हे या प्रदर्शनातील विशेष आकर्षण ठरले. या एक्सपो मध्ये अनेक विज्ञानविषयक स्टॅाल लावण्यात आले. यास विज्ञानप्रेमींची गर्दी पहायला मिळाली. दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात गझल संध्या, स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित नाट्य, स्वरानंदन या कार्यक्रमांचा प्रामुख्याने समावेश आहे. पुरातत्व विभाग संग्रहालय, पॅलेस आन व्हिल्स ही गाडी, ॲालिम्पिकच्या धर्तीवर विज्ञान ज्योत, बाल वैज्ञनिकांच्या विविध प्रयोगांचे प्रदर्शन या संमेलनात पहावयास मिळाले.
Is Indian Science Congress Successful or not Analysis