नवी दिल्ली – आयुष मंत्रालयाने अलिकडेच समाज माध्यम आणि काही वैज्ञानिक नियतकालिकां मध्ये गुडुची अर्थात गुळवेलीच्या (टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) वापराच्या सुरक्षिततेबाबत व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेतली आहे.
गुडुची अर्थात गुळवेल (टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) वापरण्यास सुरक्षित आहे मात्र टिनोस्पोरा क्रिस्पा सारख्या तशाच दिसणाऱ्या काही वनस्पती हानिकारक असू शकतात हे स्पष्ट करणारी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहे. गुडुची ही एक लोकप्रिय ज्ञात वनौषधी आहे, जी गुळवेळ (गिलोय) म्हणून परिचित आहे आणि आयुष प्रणालींमध्ये दीर्घकाळापासून उपचारांमध्ये ती वापरली जात आहे.
गुडुची अर्थात गुळवेलीची (टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) सुरक्षा आणि परिणामकारकता सिद्ध करण्यासाठी प्रमुख नियतकालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधनपर माहिती प्रकाशित झाली आहे. तिचे यकृत -संरक्षण विषयक गुणधर्म देखील सिद्ध झाले आहेत. विविध उपचारांमध्ये गुळवेलीचा वापर केला जातो आणि विविध लागू तरतुदींनुसार पद्धती नियंत्रित केल्या जातात.
टिनोस्पोराच्या विविध प्रजाती उपलब्ध आहेत आणि केवळ टिनोस्पोरा कॉर्डिफोलियाचा उपयोग उपचारांमध्ये केला जावा, टिनोस्पोरा क्रिस्पा सारख्या तशाच दिसणाऱ्या प्रजाती प्रतिकूल परिणाम करू शकतात असे आढळून आले आहे. गुळवेल हे एक सुरक्षित आणि प्रभावी आयुर्वेदिक औषध आहे, मात्र योग्य, नोंदणीकृत आयुष डॉक्टरांचा सल्ला घेऊन तिचा वापर करावा असे पुन्हा पुन्हा स्पष्ट करण्यात येत आहे.
आयुष मंत्रालयाकडे फार्माकोव्हिजीलन्सची एक सुस्थापित प्रणाली (आयुष औषधांपैकी संशयास्पद प्रतिकूल औषध परिणामांच्या अहवालासाठी)आहे , त्याचे संपूर्ण भारतात जाळे विस्तारलेले आहे. आयुष औषध घेतल्यानंतर कोणतीही संशयास्पद प्रतिकूल परिणाम झाल्यास जवळच्या फार्माकोविजिलेंस सेंटरला आयुष चिकित्सकाकडून त्याबाबत कळवले जाते. म्हणूनच असा सल्ला दिला जातो की आयुष औषध आणि उपचार फक्त नोंदणीकृत आयुष डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि सल्ल्यानेच घ्यावे.