इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मोबाइल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण, पाण्यात खेळताना किंवा अनावधानाने मोबाइलच पाण्यात पडला तर? हे ऐकूनच मनात धस्स झालं ना! मोबाईल पाण्यात पडला तर नक्की काय करावे याच्या काही टीप्स आज आम्ही तुम्हाला देणार आहोत…. फोन पाण्यात पडला तर सर्व्हिस सेंटरला चक्कर माराव्या लागतात. पण आमच्या या काही टिप्समुळे तुम्ही घरच्या घरी फोन दुरूस्त करू शकतात.
१. फोन पाण्याने ओला झाला असेल तर त्याची बॅटरी काढा. फोन आणि बॅटरी उन्हात सुकायला ठेवा. पण, बॅटरी जास्त काळ उन्हात राहणार नाही, याची काळजी घ्या. यामुळे ती खराब होऊ शकते.
२. हेअर ड्रायर अजिबात वापरू नका. अनेकदा भिजलेला फोन लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला जातो. हे फार धोकादायक आहे. यामुळे तुमचा फोन दुरूस्त होईल की नाही, हे माहीत नाही, पण फोनमध्ये आग लागण्याची भीती आहे. याशिवाय, फोनमध्ये काही छोटे छोटे पार्ट्स असतात, ते हेअर ड्रायरच्या वापरामुळे खराब होऊ शकतात.
३, फोन ओला झाला तर सगळ्यात सोपा आणि मोठ्या प्रमाणावर केला जाणारा उपाय म्हणजे, मोबाइल तांदुळात टाकणे. फोनवर पाणी पडले असेल तर ते पुसून तांदुळात ठेवावा. तांदूळ हे पाणी शोषून घेतात. काही वेळाने फोन काढून तो व्यवस्थित पुसून घ्या. आणि मगच सुरू करा.
४. मोबाइलमध्ये पाणी गेले असेल तर त्याला अजिबात चार्जर लावू नका. कारण तुमची ही थोडीशी घाई मोबाइल पूर्ण बिघडवू शकते. पाणी गेल्याची जर तुम्हाला खात्री असेल, तर आधी तो पुसून घ्या. ऑन करा, ऑन झाल्यावर मगच चार्ज करा.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आम्ही सांगलेल्या या टिप्स प्रथमोपचारासारख्या आहेत. थोडेफार पाणी गेले असेल, तर या निश्चितच उपयुक्त आहेत. पण, यापेक्षाही जास्त पाणी गेले असेल तर घरी स्वत: कोणताही प्रयोग करून न पाहता, सर्व्हिस सेंटरला जाणे, केव्हाही सोयीचे आहे.