विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
सद्यस्थितीत दोन डेसद्वारे कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी लागत आहे. मात्र, लवकरच कोविशिल्ड या लसीचा केवळ एकच डोस पुरेसा ठरणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारतात लसीकरणासाठी मुख्य लसीची भूमिका निभावणाऱ्या कोविशिल्डच्या सिंगल डोसचा नियम आणण्याची तयारी केंद्र सरकार करीत आहे. अर्थात याबाबतीत अद्याप निर्णय झालेला नसला तरीही सरकारद्वारे तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे.
कोरोना लस ट्रॅकर प्लॅटफॉर्मवरून डेटा गोळा केल्यानंतर कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याच्या आपल्या निर्णयाची समीक्षा सरकार करणार आहे. हाच डेटा सिंगल डोसच्या बाबतीत निर्णय घ्यायचा की नाही, यावर विचार करण्यासाठी सरकारला मदत करणार आहे. पण एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, ऑगस्टपर्यंत यावर विश्लेषण होण्याची शक्यता आहे.
कोविशिल्ड ही भारतात मुख्य लसीचे काम करीत आहे. आतापर्यंत देशात २०.८९ कोटी लोकांना लस देण्यात आली असून यातील ९० टक्के कोविशिल्डचे आहेत. आता रशियाच्या स्पुटनिक या लसीलाही भारतात मंजुरी देण्यात आली आहे.
नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (एनटीएजीआय) कोव्हिड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी सांगितले आहे की, ‘एक प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. याठिकाणी क्लिनिकल डेटा, लसीचा डेटा आणि समग्र आजारांचा डेटा असे तीन सेट स्थापन केले जाणार आहेत. या आधारावर लस किती प्रभावी आहे ते आम्ही तपासणार आहोत. याशिवाय दुसऱ्यांदा संक्रमण आणि त्याच्या परिणामाचा अभ्यास करू. मार्च-एप्रिलमध्ये लसीकरणाच्या प्रभावाचा अभ्यास आवश्यक असल्याचीही चर्चा आमच्यात झाली आहे.’
सिंगल डोसचा नियम आल्यास मोठ्या लोकसंख्येचे अतिशय वेगाने लसीकरण होईल. सध्या लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरणाचा वेगही भारतात चांगलाच मंदावला आहे. पण कोविशिल्डच्या सिंगल डोसला मंजुरी मिळाल्यास प्रश्नच सुटणार आहे.