नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून देश सावरत असताना पुन्हा रुग्णसंख्या वाढत असल्याने तिसर्या लाटेचे संकेत मिळत आहेत. केरळमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने केंद्र सरकारने त्वरित उच्चस्तरीय पथक केरळला रवाना केले आहे.
दिल्लीतून रवाना झालेल्या या सहा सदस्यीय पथकात नॅशनल सेंटर फॉर डिसिस कंट्रोलचे (एनसीडीसी) संचालक डॉ. सुजीत कुमार सिंह यांना अध्यक्ष बनविण्यात आले आहे. येत्या तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी पथकाला दिले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडावियाने सोशल मीडियावर याची माहिती दिली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. हे पथक ३० जुलैला केरळच्या संसर्गग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करून संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक दिशानिर्देश देणार आहे. तसेच आपला संपूर्ण अहवाल राज्य आणि केंद्र सरकारला सुपूर्द करणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी दिली. एकूण सक्रिय रुग्णांपैकी ३७.१ टक्के रुग्ण फक्त केरळमध्ये आहेत. तिथे १.५४ लाखांहून अधिक रुग्णांवर उपाचार सुरू आहेत.
गेल्या सात दिवसांत केरळमध्ये १.४१ टक्के रुग्णांची संख्या वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. दररोज सरासरी १७,४४३ रुग्ण आढळत असून, संसर्गाचा दर १२.९३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आठवड्याचा संसर्ग दर ११.९७ टक्के आहे. केरळमध्ये सहा जिल्ह्यांमध्ये सध्या दररोज १०-१० टक्क्यांहून अधिक नमुने कोरोना संक्रमित आढळत आहेत.
इतर राज्यांमध्येही कमी-अधिक प्रमाणात केरळमधील वाढत्या कोरोना संसर्गाचा परिणाम दिसून येत आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्येत चढ-उतार सुरू आहे. उत्तर प्रदेश आणि मणिपूरसह काही राज्यांमध्ये नवे रुग्ण आढळत आहेत.
गेल्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली होती. १० मेस रुग्णसंख्येचा उच्चांक झाल्यानंतर नव्या लाटेबाबत कयास लावण्यास सुरुवात झाली होती. ऑगस्टमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज आयसीएमआरने लावला होता. केंद्र सरकारच्या सुपर मॉडेलनुसार, तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान येऊ शकते.
तिसर्या लाटेची उसळी कधीही शक्य
आरोग्य डाटा तज्ज्ञ प्रा. रिजो एम जॉन सांगतात, गेल्या ५१ दिवसांत देशात दररोज सरासरी ४० हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. याचाच अर्थ असा की दुसर्या लाटेतून बाहेर आल्यानंतर देशातील कोरोनारुग्णांची संख्या एका ठराविक आकड्यांवर येऊन थांबली आहे. हा आकडा कधीही उसळी घेऊ शकतो.