नवी दिल्ली – देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरून काहीसा दिलासा मिळत नाही, तोच आता पुन्हा एकदा देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक आणखी वाढतांना दिसून येत आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये सध्या भितीदायक वातावरण आहे. विशेषत: केरळमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केरळ सध्या सर्वाधिक भयंकर स्थिती येण्याचा शक्यता आहे, अशी भीती केरळच्या आठ जिल्ह्यांचा दौरा केलेल्या सहा सदस्यीय केंद्रीय पथकाने व्यक्त केली आहे. त्यामुळे केरळमध्ये तिसऱ्या लाटेला प्रारंभ झाला आहे की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय पथकाचे नेतृत्व करणारे नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे संचालक डॉ. सुजित सिंग यांनी सांगितले की, केरळमधील अत्यंत महत्वाचा असा ओणम हा सण दि. २० ऑगस्ट रोजी आल्यामुळे उपक्रम आणि पर्यटनस्थळे अनलॉक होतील. परंतु सर्व व्यवहार खुले करण्याच्या किंवा उघडण्याच्या निर्णयामुळे एक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली असून ही चिंतेची बाब आहे.
सिंग यांनी सांगितले की, गेल्या सात दिवसांत देशात नोंदवलेल्या कोविड -१९ प्रकरणांपैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे केरळमधील असून येत्या आठ दिवसात म्हणजे २० ऑगस्ट पर्यंत राज्यात कोविड -१९ ची सुमारे ४ लाख ६० हजार नव्या बाधितांची नोंद होऊ शकते. केरळमधील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने पूर्वी देखील एक टीम पाठवली होती. आजपासून केरळमध्ये मॉलमध्ये बंद असलेली दुकाने उघडतील परंतु त्यांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. सुजीत सिंग आणखी म्हणाले की, या दक्षिणेकडील राज्यात लोकांना लशींचे दोन्ही डोस दिले असूनही कोरोनाची लागण झाल्याने या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. उदाहरणार्थ, पठाणमथिट्टा जिल्ह्यात, पहिला डोस घेतल्यानंतर १४,९७४ लोकांना विषाणूची लागण झाली होती, तर दोन्ही डोस घेतल्यानंतर ५,०४२ लोकांना संसर्ग झाला होता.
केंद्रीय पथकाने सादर केलेल्या अहवालानुसार, सर्व आठ जिल्ह्यांमध्ये कोविड -१९ पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांहून अधिक असल्याचे आढळून आले असून काही ठिकाणी तो वाढत असल्याचे दिसून आले. यात सुमारे ८० टक्क्यांहून अधिक प्रकरणे डेल्टा स्वरूपाची आहेत. सध्याची परिस्थिती अशीच वाढत राहिल्यास दि. २० ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत सुमारे ४.६२ लाख प्रकरणे नोंदली जाण्याची शक्यता आहे. या पथकाने अलीकडेच कासारगोड, कन्नूर, कोझीकोड, मलप्पुरम, अलप्पुझा, कोल्लम, पठानमथिट्टा आणि तिरुअनंतपुरम जिल्ह्यांना भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांना केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कंटेनमेंट झोन तयार केलेले नाहीत. असे आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे ५५ टक्के लोकसंख्येला अजूनही संसर्गाचा धोका आहे.