नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा कहर कमी झालेला दिसत असला तरी तो पूर्णपणे संपलेला नसून, सर्व जगातील देशांनी सार्वजनिक आरोग्य उपकरणांचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता आहे. असे सांगत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अॅडनॉम घेबरियस यांनी जगाला सजग राहण्याचा इशारा दिला आहे. संपूर्ण जगाने विडा उचलला तरच ही महामारी समूळ नष्ट होईल, असे त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख घेबरियस बर्लिनमध्ये जागतिक आरोग्य परिषदेत संबोधित करत होते. ते म्हणाले, जगातील सर्व देशांकडे आवश्यक असलेली सर्व आरोग्य आणि प्रभावी वैद्यकीय उपकरणे आहेत. एका आठवड्यात ५० हजार मृत्यू झाले आहेत. त्यामुळे महामारी संपली असे म्हणता येणार नाही. संपूर्ण जगाने मनावर घेतल्यावरच ही महामारी समाप्त होईल. जी-२० देशांच्या ४० टक्के लोकसंख्येने कोव्हॅक्स तंत्र आणि अफ्रिकी व्हॅक्सिन अधिग्रहण ट्रस्ट (एव्हीएटी) मध्ये सक्रिय सहभाग घ्यायला हवा. जगातील सर्व देशांनी लसीकरणाला वेग द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
देशात पुन्हा वाढली चिंता
भारतात पुन्हा एकदा कोरोनामुळे मृत्यू होणार्यांची संख्या वाढल्याने यंत्रणेची चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासात देशात कोरोनामुळे ४४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात १४,३०६ रुग्ण आढळले आहेत. अशा प्रकारे देशात कोरोनारुग्णांची एकूण संख्या ३,४१,८९,७७४ वर आणि मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ४,५४,७१२ वर पोहोचली आहे.