नवी दिल्ली – कोरोना लशीचा बूस्टर डोस घेण्याबाबत संपूर्ण जगात चर्चा सुरू आहे. देशातील नागरिकांनाही बूस्टर डोस द्यावा की नाही याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. भारतात वयस्क नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत. त्यानंतर १२ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होईल. नागरिकांना बूस्टर डोस द्यावा लागू शकतो, परंतु आम्ही सध्या लसीकरण पूर्ण करण्याकडे लक्ष देत आहोत, अशी माहिती एका अधिकार्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.
अखेरीस आम्हाला बूस्टर डोसची गरज भासू शकते. त्याबाबत चर्चाही झाली आहे. परंतु सध्या वयस्कांचे लसीकरण पूर्ण करून नंतर मुलांच्या लसीकरणाची प्रक्रिया सुरू करण्याकडे आमचे लक्ष आहे. झायडस कॅडिला लशीला मान्यता देण्यात आली आहे. झायडस लशीचा समावेश व्यवस्थेत कसा करावा याबाबत विचार सुरू आहे, असे अधिकारी म्हणाला. लसीकरण मोहिमेत लवकरच झायडस लशीचा समावेश होण्याची शक्यता आहे.
लहान मुलांच्या लसीकरणाबाबतच्या घोषणेची वाट पाहिली जात आहे. बुधवारी रात्रीपर्यंत देशात २३.६ कोटी नागरिक पूर्णपणे लसवंत झाले आहेत. उर्वरित ४०.९ कोटी नागरिकांना लशीचा पहिला डोस मिळाला आहे. ६८.७ टक्के नागरिकांना कमीत कमी लशीचा एक डोस दिल्यानंतर पहिल्या डोसची मागणी कमी होईल. अनेक पाश्चिमात्य अनेक देशात बूस्टर डोस दिला जात आहे.
एक कोविड बूस्टर डोस हा लशीचा एक अतिरिक्त डोस आहे. त्यापूर्वी घेतलेल्या लशीच्या डोसमुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ नये हाच बूस्टर डोस देण्याचा उद्देश आहे. अमेरिकेत उच्च जोखीम असलेले आरोग्य कर्मचारी आणि इतर नागरिकांना बूस्टर डोस देण्यास मंजुरी मिळाली आहे.
लशीच्या असमान उपलब्धतेमुळे बूस्टर डोस देण्यावरून अनेक वादही झाले आहेत. जगात असे काही देश आहे जिथे कोरोना लशीचा एकही डोस न घेतलेले नागरिक आता बूस्टर डोस घेत आहेत. अफ्रिकेच्या अनेक भागात अद्याप कोरोना लशीचा एकही डोस मिळालेला नाही.