नवी दिल्ली – देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन हा मूळ विषाणूच्या तुलनेत तीन पटीच्या वेगाने फैलावत आहे. भारतात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण २ डिसेंबरला आढळला होता. परंतु फक्त १९ दिवसांतच ओमिक्रॉनबाधितांची संख्या २०० वर पोहोचली आहे. त्याउलट कोरोनाच्या मूळ विषाणूची बाधा झालेले २०० रुग्ण ६० दिवसांत आढळले होते. यावरून ओमिक्रॉनचा फैलाव मूळ विषाणूच्या ३१८ टक्क्यांनी अधिक आहे, हे सहज लक्षात येते.
ओमिक्रॉनमुळे दररोज सरासरी १०.५ नागरिक बाधित झाले तर सुरुवातीच्या दोन महिन्यांमध्ये मूळ विषाणूमुळे दररोज फक्त ३.३ नागरिक बाधित झाले होते. देशात पहिला कोरोनारुग्ण ३० जानेवारी २०२० रोजी आढळला होता. त्यानंतर १ एप्रिल २०२० पर्यंत कोरोनाबाधितांची संख्या वाढून २०० झाली होती. ओमिक्रॉनने बाधा झालेला पहिला रुग्ण दक्षिण अफ्रिकेत आढळला होता. त्यानंतर ओमिक्रॉनचा जवळपास १०० देशांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. याच कारणांमुळे भारतातील ओमिक्रॉनबाधितांचा वेग पाहता वेगवेगळ्या शक्यता वर्तविल्या जात आहेत.
महाराष्ट्र-दिल्लीत सर्वाधिक रुग्ण
देशातील १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला आहे. आतापर्यंत २३६ नागरिक ओमिक्रॉनबाधित झाले आहेत. त्यापैकी १०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ६५ रुग्ण तर दिल्लीमध्ये ६४ रुग्ण आढळले असून दिल्ली दुसर्या स्थानावर आहे. तेलंगणमध्ये २४, कर्नाटकमध्ये १९, राजस्थानमध्ये २१, आणि केरळमध्ये १५ रुग्णांची नोंद झाली आहे.
देशात अशाप्रकारे आढळले रुग्ण
तारीख (डिसेंबर महिना) एकूण रुग्ण
२- ०१
७- ३२
१६- ८१
१७- १११
२१- २००
२३- २३६