मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील शाळेतील विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्यास त्यांची नावे शाळेच्या हजेरी पटावरुन कमी करण्यात येत नाहीत किंवा त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात नाही. आधारकार्ड नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषद सदस्य ॲड.निरंजन डावखरे यांनी नियम 93 अन्वये राज्यात शाळेतील विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसलेल्यांची नावे शाळेच्या पटावरुन कमी करण्याची सूचना शिक्षण विभागाने दिली असल्याचे निदर्शनात येणे, त्यामुळे पालकांमध्ये निर्माण झालेला असंतोष याबाबत नियम 93 अन्वये सूचना मांडली होती. त्यावर शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत निवेदन केले.
पोर्टलवार नोंद करताना विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक विचारला जातो, तो फक्त डेटा उपलब्ध असावा म्हणून असतो परंतु विद्यार्थ्यांना सक्ती केली जात नाही किंवा त्यांना वर्गाबाहेर किंवा हजेरी पटावरील नाव कमी केले जात नाही. आधारकार्ड नाही म्हणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले जाणार नाही असेही श्रीमती गायकवाड यांनी यावेळी सांगितले.