अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आता कोणत्याही प्रकारचा विमा घेताना एजंटच्या कमिशनची संपूर्ण माहिती कंपनीच्या वतीने ग्राहकांना देणे बंधनकारक असेल. लवकरच हा नियम लागू होणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) हा नियम लागू करण्यासाठी औपचारिक मान्यता दिली आहे. या नियमामुळे पॉलिसी खरेदी केल्यानंतर दिल्या जाणाऱ्या पावती आणि कागदपत्रांवरच एजंटचे कमिशन कळू शकणार आहे.
कोणत्याही प्रकारची पॉलिसी घेतल्यावर एजंटला मिळणाऱ्या कमिशनबाबत सध्या ग्राहकांना कोणतीही माहिती दिली जात नाही. आता बदललेल्या नियमामुळे ही माहिती ग्राहकांना कळणार आहे. तसेच हा नियम सर्व प्रकारच्या विम्यांना लागू करण्यात येणार आहे. विम्याची व्याप्ती वाढवण्यासाठी IRDAI विमा क्षेत्रात संपूर्ण पारदर्शकता आणणार आहे. विमा कंपन्या काही वेळा एजंटला IRDAI ने ठरवलेल्या नियमांपेक्षा जास्त कमिशन देतात. मात्र आता विमा कंपन्या हे करू शकणार नाहीत. यामुळे ग्राहकांनाही अधिकचे पैसे द्यावे लागणार नाही.
विमा कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन किंवा एजंटद्वारे विमा घेताना ग्राहकाला त्या सेवेचेही पैसे द्यावे लागतात. सध्या वेगवेगळ्या कंपन्या एकाच प्रकारचे आरोग्य विमा किंवा मोटार विमा घेण्यासाठी वेगवेगळे प्रीमियम आकारतात. याचे एक कारण म्हणजे एजंटचे कमिशन वेगवेगळ्या प्रमाणात दिले जाते. त्यामुळे प्रीमियमच्या किंमतींमध्येही फरक दिसतो. आता बदललेला हा नियम जुलैमध्येच लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
विमा कंपन्यांमध्ये मात्र या निर्णयाबद्दल नाराजी असल्याचे दिसून येत आहे. एलआयसी मुख्यतः त्याच्या एजंटवर अवलंबून असते आणि या निर्णयामुळे एजंटला त्रास होऊ शकतो. एजंट्सनी सांगितले की, कमिशन उघड झाल्यामुळे ग्राहक त्यांच्याकडून कमिशनच्या काही भागाची मागणी करू शकतात. कारण बाजारात खूप स्पर्धा आहे. विमा कंपन्यांच्या कर्मचार्यांच्या मते, सामान्य विमा कंपन्या त्यांच्या एजंटना आरोग्य आणि मोटार विम्यावर १५ टक्के कमिशन आणि चार टक्क्यांपर्यंत प्रोत्साहन देतात.
जीवन विम्याच्या बाबतीत, कमिशन विम्याच्या मुदतीवर अवलंबून असते. एसबीआय जनरल इन्शुरन्सने फक्त ५७ रुपयांपासून सायबर विमा सुरू केला आहे एसबीआय लाइफने मंगळवारी किरकोळ ग्राहकांसाठी सायबर विमा सुरू केला. सायबर व्होल्टेज नावाच्या या विमाद्वारे बँक खात्यात ठेवलेल्या १० हजार रुपयांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचा विमा काढता येऊ शकतो. यासाठी ५७ ते २१४७ रुपये प्रीमियम भरावा लागेल, जो विविध अटींवर अवलंबून असेल.
IRDAI Insurance Agent New Rule Customers