नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत सरकारचा उपक्रम असलेल्या आयआरसीटीसीच्या मागणीप्रमाणे नाशिकमध्ये पर्यटन वाढीसाठी तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘बजेट हॉटेलसाठी’ नाशिकमध्ये जमीन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी व राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र दिले आहे.
छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम कोर्पोरेशन लि. (आयआरसीटीसी) ही भारतीय रेल्वेची एक विस्तारित शाखा आहे. भारत सरकारचा उपक्रम असलेली आयआरसीटीसी ही संस्था केटरिंग आणि हॉस्पिटॅलिटी सेवांद्वारे श्रेणी सुधारित करणे, व्यावसायिक बनवणे आणि व्यवस्थापित करणे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देणे आणि बजेट हॉटेल्स, विशेष टूर पॅकेजेस यांचा विकास करण्यासाठी काम करते. हा उपक्रम रेल्वे पर्यटन पोर्टलद्वारे आणि बजेट हॉटेल्स, लक्झरी ट्रेन्स चालवून पर्यटनाला चालना देत आहे. उदा. महाराजा एक्सप्रेस, बुद्धीस्ट सर्किट ट्रेन्स इ. आयआरसीटीसीची नवी दिल्ली, रांची, पुरी आणि कोलकाता येथे बजेट हॉटेल्स आहेत. सध्या लखनौ, खजुराहो आणि केवडिया (गुजरात) येथे हॉटेलचे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, कॉर्पोरेशनकडून संपूर्ण देशात पीपीपी तत्त्वावर बजेट हॉटेल्स/आलिशान हॉटेल्स जोडून या व्यवसायाचा विस्तार केला जात आहे. त्यादृष्टीने पर्यटनासाठी महत्वाचे शहर असलेल्या नाशिकमध्ये आयआरसीटीसीकडून बजेट ३ स्टार व ४ स्टार हॉटेलच्या विकासासाठी १०० -१२५ खोल्यांसाठी योग्य जमीन उपलब्ध करण्याचे प्रयत्न आहे. संचालक (वित्त) आयआरसीटीसी नवी दिल्ली यांनी मा.मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांना दि.९ डिसेंबर २०२२ रोजी नाशिक शहरात बजेट हॉटेलसाठी जागा उपलब्ध करून देण्याची पत्राद्वारे विनंती केली आहे. नाशिकचे पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व तसेच आगामी कुंभमेळा लक्षात घेता, आयआरसीटीसीला नाशिकमध्ये बजेट हॉटेल्स तयार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून नाशिकच्या पर्यटनाला अधिक चालना मिळणार असून नाशिकची पर्यटन क्षमता वाढून अर्थकारणाला देखील अधिक गती मिळणार असल्याचे म्हटले आहे.
त्यादृष्टीने पर्यटनासाठी अतिशय महत्वाचे शहर असलेल्या नाशिक शहरात आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना दर्जेदार निवासाच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी आयआरसीटीसी या भारत सरकारच्या उपक्रमास बजेट हॉटेल तयार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
IRCTC Will Start 3 Star 4 Star Hotel in Nashik Upcoming Kumbhamela