मुंबई – माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह नक्की कुठे आहेत हा सर्वांनाच पडलेला गहन प्रश्न आहे. कारण, १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप त्यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला. देशमुख सध्या तुरुंगात असले तरी परमबीर फरार आहेत. तसे राज्य सरकारने घोषित केले आहे. आरोप करुन परमबीर पळून गेले आणि देशमुख मात्र अडकले, अशी चर्चा सर्वत्र होत आहे. मात्र, परमबीर सध्या नक्की कुठे आहेत याचा उलगडा आज झाल आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत परमबीर सिंह यांच्या वकिलांंनी न्यायालयाला काही माहिती सादर केली आहे. परमबीर यांच्या वकीलांनी न्यायालयाला सांगितले की, परमबीर हे भारतातच आहेत. ते भारत सोडून कुठेही गेलेले नाही. तसेच, त्यांना महाराष्ट्रात जाण्याची भीती वाटत आहे. महाराष्ट्रात त्यांच्या जीवाला धोका आहे, असे त्यांना वाटते आहे. या भीतीपोटीच ते सर्वांसमोर येत नाहीत, असे वकीलाने न्यायालयाला सांगितले आहे.
जोपर्यंत परमबीर सिंह त्यांच्या ठिकाणाबद्दल माहिती देणार नाहीत, तोपर्यंत कोणतीही सुरक्षा मिळणार नाही, कोणतीही सुनावणी होणार नाही, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने गुरुवारी दिले होते. परमबीर सिंह यांनी आपल्याला सुरक्षा मिळावी यासाठी न्यायालयाला साकडे घातले होते.
न्यायालयाने त्यांच्या वकिलांना परमबीर सिंह यांचा पत्ता सांगण्याचे निर्देश दिले होते. तसेच माजी पोलिस आयुक्तांकडून त्यांची पॉवर ऑफ अटॉर्नीच्या याचिकेचा २२ नोव्हेंबरला यादीत समावेश केला होता. न्यायमूर्ती एस के कौल आणि न्यायमूर्ती एम एम सुंदरेश यांचे खंडपीठ म्हणाले, की सुरक्षा देण्याच्या त्यांची याचिका पॉवर ऑफ अटॉर्नीच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेली आहे.
https://twitter.com/LiveLawIndia/status/1462678191948976138
तुम्ही सुरक्षेची मागणी करत आहात, परंतु तुम्ही कुठे आहात याबद्दल कोणालाच काहीच ठाऊक नाही. तुम्ही परदेशात बसून पॉवर ऑफ अॅटॉर्नीच्या माध्यमातून कायदेशीर आधार घेत असाल तर काय होणार? जर असे असेल तर न्यायालयाने तुमच्या बाजूने निकाल दिला तरच तुम्ही भारतात येणार आहात. तुमच्या डोक्यात काय चालू आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. जोपर्यंत तुम्ही कुठे आहात, याबद्दल कळणार नाही तोपर्यंत कोणतीही सुरक्षा नाही आणि सुनावणीही नाही, अशा शब्दात न्यायालयाने परमबीर यांना खडसावले होते.
मुंबईतील एका न्यायालयाने बुधवारी परमबीर सिंह यांना त्यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या वसुलीच्या खटल्यात फरारी घोषित केले होते. परमबीर सिंह हे या वर्षी मे अखेर कार्यालयात आले होते. त्यानंतर ते रजेवर गेले. त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे मुंबई पोलिसांनी गेल्या महिन्यातच न्यायालयाला सांगितले होते.