नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय संस्कृती लग्न सोहळ्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कोणताही लग्न सोहळा म्हटले की खर्च हा आलाच, अलीकडच्या काळात काही प्रमाणात गोरगरीब स्तरातील लोक सोडले, तर मध्यमवर्गीय आणि श्रीमंत वर्ग यांच्या कुटुंबामध्ये लग्न सोहळा अत्यंत थाटामाटात आणि खर्चिक पद्धतीने साजरा करण्याची जणू काही प्रथाच पडली आहे. खरे म्हणजे लग्न सोहळा आपण किती श्रीमंत आहोत ! हे दाखविण्याचा समारंभ बनला आहे . ‘होऊ द्या खर्च ‘ अशा पद्धतीने लग्नातील प्रत्येक साजरा केला जातो. मग हळदी समारंभ, मेंहदी समारंभ, कपडे -साड्या, डीजे, मंडप वैगेरे वैगेरे यासारख्या गोष्टींवर हजारो नव्हे तर लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते. त्यातच अलीकडे विमानात लग्न, हत्तीवरून मिरवणूक, पाण्यात विवाह सोहळा, हेलिकॉप्टर मधून नवरदेव येणे, घोड्यावरून नवरीला आणणे, जहाजात लग्न, होडीत मंगलाष्टके असे प्रकारही निघाले आहेत. मात्र त्याच समाजातील काही विचारी मंडळी साध्या पद्धतीने लग्न सोहळा साजरे करून समाजापुढे आदर्श निर्माण करतात एका सनदी अधिकारी आणि पोलीस खात्यातील महिला अधिकारी यांनी अत्यंत साधेपणाने लग्न सोहळा साजरा करून समाजापुढे जणू काही आदर्श ठेवला आहे. या विवाह सोहळ्याला केवळ २ हजार रुपये खर्च आला आहे हे कोणाला सांगितले तर खरे वाटणार नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे. आता या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
कोर्टात लग्न
छत्तीसगड कॅडरचे आयएएस अधिकारी युवराज मरमट हे रायगड जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तेलंगणा कॅडरच्या आयपीएस अधिकारी पी. मोनिका यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यांनी कोर्टात लग्न केले आहे. कमी खर्चात अगदी साधेपणाने केलेलं हे लग्न सध्या चर्चेचा विषय झाला आहे. अनेक जण लग्नसोहळ्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. मात्र या दोघांनी कोर्टात लग्न करून आदर्श निर्माण केला आहे
त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कारण या दोघांनी लग्नात हार, मिठाई आणि कोर्ट फीसाठी फक्त २ हजार रुपये खर्च केले आहेत.
ओळखीचे रूपांतर प्रेमात
युवराज मरमट आणि पी मोनिका हे २०११ बॅचचे अधिकारी आहेत. या दोघांची ओळख प्रशिक्षणादरम्यान झाली होती. युवराज मरमट हे छत्तीसगड कॅडर तर, पी मोनिका तेलंगणा कॅडरमधील आहेत. पी मोनिका यांची प्रशिक्षणादरम्यान युवराज मरमट यांच्याशी ओळख झाल्यानंतर दोघेही प्रेमात पडले. मरमट हे मूळचे राजस्थानमधील गंगानगर शहरातील आहेत. बीएचयूमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक शिक्षण घेतले आहे. आयएएस होण्यापूर्वी त्यांची भारतीय अभियांत्रिकी सेवेत निवड झाली होती. आयपीएस अधिकारी पी मोनिका या ‘फॅशन आयकॉन’ आहेत. सोशल मीडियावर त्या सक्रिय असतात. आयपीएस पी मोनिका या पदवीधर आहेत. फिटनेसचीही त्या विशेष काळजी घेतात. खरे म्हणजे सर्वांनीच अशा प्रकारे लग्न सोहळ्यावर असा खर्च करण्याऐवजी तो पैसा समाज उपयोगी कामासाठी द्यायला हवा असा विचार आता पुढे येऊ लागला आहे.
IPS P Mounika And IAS Yuvraj Marmat Marriage Simplicity