मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकार कोणतेही असो, कधी एखाद्या अधिकाऱ्यावर गंडांतर येईल आणि कधी पुन्हा त्याच अधिकाऱ्याकडे महत्त्वाची जबाबदारी येईल, सांगता येत नाही. राजकारणातील एखादा मोठा नेता गुन्ह्याची शिक्षा म्हणून कारागृहात जातो आणि नंतर तोच पुन्हा मंत्री होतो, असा प्रकार आहे. पोलीस उपायुक्त म्हणून निलंबित झालेले सौरभ त्रिपाठी यांची पुन्हा एकदा एन्ट्री झाल्यामुळे ही चर्चा अधिकच रंगत आहे.
सौरभ त्रिपाठी यांना ज्या प्रकरणात निलंबित करण्यात आले होते, त्या प्रकरणाच्या संदर्भात बरीच चर्चा झाली. चौकश्या झाला आणि कारवाई सुद्धा झाली. मात्र त्यांच्या निलंबनाप्रकरणी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने त्रिपाठी यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली. आयपीएस अधिकाऱ्याला तीन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी निलंबित ठेवता येत नाही, त्यामुळे त्रिपाठी यांचे निलंबन मागे घेण्यात येत आहे, असे या समितीने म्हटले होते.
त्रिपाठी यांचे निलंबन २३ जून रोजी मागे घेण्यात आले होते. पण त्यांना कोणतेही पद देण्यात आले नव्हते, अखेर सोमवारी त्रिपाठी यांना राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. खंडणीचे आरोप झाल्यानंतर निलंबनाची कारवाई झालेले पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांची राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्तपदी नेमणूक झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्रिपाठींवरील गुन्हा, त्यांचे निलंबन यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली होती.
आयुक्तांनीच केली तक्रार
अंगडिया व्यावसायिक संघटनेचे योगेश गांधी, जतीन शहा, मधूसुदन रावल व मगनभाई प्रजापती यांनी ७ डिसेंबर २०२१ रोजी तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांची भेट घेतली व त्रिपाठी यांनी खंडणी मागितल्याची तक्रार केली होती. त्यानंतर दिलीप सावंत यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आली होती. दिलीप सावंत यांनी स्वतः याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून गेल्या वर्षी गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमकं काय घडलं?
प्राथमिक चौकशीत २, ३, ४ व ६ डिसेंबरला आरोपी पोलीस अधिकारी व इतर संशयितांनी अंगडिया व्यावसायिकांना डांबून ठेवले व प्राप्तिकर विभागाला माहिती देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून खंडणी उकळल्याचे कळले. सावंत यांना प्राथमिक तपासात आरोपी पोलिसांविरोधात नऊ मुद्दे सापडले. आरोपी पोलिसांनी त्यांच्या जाण्या-येण्याच्या चुकीच्या नोंदी पोलीस डायरीत केल्या होत्या. गुन्हा घडला, त्यापूर्वी चार दिवस भुलेश्वर परिसरात संशयित चोरीची मालमत्ता विक्रीसाठी आल्याचा संशय होता. तपासणीत काहीच सापडले नाही, म्हणून त्यांना सोडून देण्यात आले अशा खोट्या नोंदी डायरीत करण्यात आल्या होत्या.
Saurabh Tripathi’s come-back controversy!
IPS Officer Saurabh Tripathi Come Back Controversy
Maharashtra Government Politics Allegations