विशेष प्रतिनिधी, मुंबई
एसआयडीमध्ये असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीररित्या टॅप केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठविलेल्या समन्सविरोधात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चौकशीच्या समन्सला स्थगिती देण्याची याचिका रश्मी शुक्ला यांनी केली आहे. चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोप शुक्ला यांनी केला आहे.
मुंबई पोलिसांनी त्यांना दोन वेळा समन्स पाठवला होता. पोलिसांनी त्यांना आज चौकशीसाठी बोलावले होते. पोलिसांच्या पोस्टिंगबाबत गोपनीय कागदपत्रे गहाळ केल्या प्रकरणी त्यांना पोलिसांनी समन्स पाठविले होते. रश्मी शुक्ला यांनी २९ एप्रिलला याचिका दाखल केली होती ६ मे रोजी यावर हैदराबाद उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोप शुक्ला यांनी याचिकेत केला आहे. याचिकेत राज्य सरकार, पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त आणि सायबर सेलचे आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
मंत्र्यांचे फोन बेकायदेशीररित्या टॅप केल्याच्या आरोपावरून शुक्ला यांना २८ एप्रिलला सायबर पोलिस ठाण्यात हजर राहण्याबाबत समन्स पाठविण्यात आला होता. कोरोनाची परिस्थिती असल्याने चौकशीला येऊ शकणार नाही, असे शुक्ला यांनी पोलिसांना कळविले होते. चौकशीची खूपच घाई असेल तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असे रश्मी शुक्ला यांनी सायबर सेलला सांगितले. रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलिस दलात अतिरिक्त महासंचालकपदी हैदराबाद येथे कार्यरत आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. या प्रकरणी सीबीआय शुक्ला यांना साक्षीदार करणार आहे. हैदराबाद येथे शुक्ला यांचा जबाब नोंदविण्यात आला.