मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस दलामध्ये रुजू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच दबाव आणल्याचा दावा पुन्हा एकदा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात केला आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना देशमुख यांच्या गैरव्यवहारांबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना गैरव्यवहारांची आधीपासूनच माहिती होती, असेही परमबीर यांनी म्हणले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे दोन माजी सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्याविरुद्ध सीबीआयने विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. परमबीर सिंह यांचा जबाब या आरोपपत्राचा मुख्य भाग आहे. या प्रकरणी वाझे हे माफीचा साक्षीदार झाले असून, देशमुखांवर पदाचा दुरुपयोग केल्याचा आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. परमबीर यांच्या जबाबाची प्रत सोमवारी उशिरा समोर आली. वाझे यांना पुन्हा पोलीस दलात का रुजू करण्यात आले या मुद्यावर परमबीर यांनी जबाबात दावा केला आहे. त्यामुळे या जबाबाला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक सुरा चौहान यांनी त्यांची भेट घेतली होती आणि वाझे यांना पुन्हा नियुक्त करण्यासाठी दबाव आणला होता. आदित्य यांच्याशी याबद्दल बोललो असता त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलण्यास सांगितले. त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यावेळी त्यांनी वाझे यांना पुन्हा पोलीस दलात रुजू करुन घेण्यास सांगण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री आणि देशमुख यांच्या दबावामुळे वाझे यांना पुन्हा सेवेत सामावून घेतल्याचा दावा परमबीर यांनी केला आहे. देशमुख यांनी केलेल्या गैरकारभाराचा मुद्दा आपण उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडेही मांडल्याचा दावाही परमबीर यांनी केला आहे.
परमबीर यांनी सीबीआयला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मार्च २०२१ मध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांची अनेक वेळा भेट घेतली. त्यापूर्वीही त्यांना भेटलो आणि देशमुख यांच्या चुकीच्या कृत्यांची माहिती त्यांना दिली. ४ ते १५ मार्च २०२१ दरम्यान वर्षा निवासस्थानी एक बैठक झाली. तिथेही मुख्यमंत्र्यांना देशमुखांच्या चुकीच्या कृतींबद्दल माहिती दिली. पण देशमुख हे आमचे गृहमंत्री आहेत इतकंच ते म्हणाले. इतकेच नव्हे, तर मार्च २०२१ मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या गैरकृत्यांची माहिती दिली होती. पण देशमुख हे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत त्यामुळे पवारांकडूनही याबाबत फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
ips officer parambir singh cbi statement cm uddhav thakre anil deshmukh