मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएस अधिकारी डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या फोटोग्राफीचे जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते करण्यात आले. वैधमापन शास्त्र विभागाचे प्रधान निरीक्षक तथा राज्याचे सह पोलिस महासंचालक डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी गेल्या काही वर्षात भारताच्या विविध भागात सण, सोहळे तथा सांस्कृतिक उत्सवाचे छायाचित्रण केले. त्र्यंबकेश्वर तथा नाशिक अशा तब्बल दोन ठिकाणी वेगवेगळ्या कालखंडात त्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यात पोलिस दलाचे जिल्हा पोलिस प्रमुख, पोलिस आयुक्त या नात्याने नेतृत्व केले. तत्पुर्वी त्यांनी दक्षिण मध्या सांस्कृतिक विभागाचे संचालक म्हणून काम पाहिले. गुरू ग्रंथसाहेब त्रिशतक महोत्सवा निमित्त आयोजित गुर ता गद्दी सोहळ्याच्या वेळी ते पोलिस प्रमुख होते.
भारतीय सांस्कृतिक विभागाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त चंदिगड येथे आयोजित माटी के रंग या राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवाचे प्रमुखपद त्यांनी भूषविले. पंढरपूरची वारी असो की त्रिंबकेश्वरची निवृत्तीनाथ महाराज यात्रा असो की खजूराहो नृत्य महोत्सव, या प्रत्येक प्रसंगात कॅमेरा हा त्यांचा सोबती म्हणून राहिला. त्या प्रत्येक वेळी त्यांनी वेळात वेळ काढून सोहळ्याचे नेतृत्व करताना आपल्या कॅमेर्यातून भारतीय संस्कृतीचे रंग टिपण्याचा प्रयत्न केला. त्यातील निवडक छायाचित्र या प्रदर्शनात मांडण्यात आले आहे.
यापूर्वी त्यांचे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगीर कला दालनात भरवण्यात आले होते. सिंहस्थ कुंभमेळ्यावर छायाचित्र प्रदर्शना सोबत त्यांचे, कुशावर्ताचा कोतवाल हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. नांदेडच्या माळेगाव यात्रेत छायाचित्रांसोबत त्या यात्रेची माहिती देणारे पुस्तक त्यांनी लिहीले आहे. या वाटचालीत त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी तथा कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांची मोलाची साथ लाभली. हे प्रदर्शन ५ डिसेंबर पर्यंत जहांगीर कला दालनात दररोज सकाळी ११-०० ते सायंकाळी ७-०० या कालावधीत खुले राहिल. प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध करण्यात आले आहे.
IPS Officer Dr RavindraKumar Singhal Photography Exhibition