विशेष प्रतिनिधी, पाटणा :
बिहारमधील एका निलंबित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे प्रचंड घबाड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक गुन्हे युनिटने आयपीएस अधिकारी आणि तत्कालीन भोजपूरचे एसपी राकेश कुमार दुबे यांच्या चार ठिकाणी असलेल्या घरांवर छापे टाकले. बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या पाटणा आणि झारखंडमधील प्रत्येकी दोन ठिकाणांच्या शोधात करोडो रुपयांच्या जंगम आणि स्थावर मालमत्ता उघड झाल्या आहेत. त्याने ही कमाई अनेक रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये गुंतवली आहे. या पथकाला आतापर्यंतच्या तपासात राकेश दुबेने २ कोटी ५५ लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता घेतल्याचे पुरावे मिळाले आहेत.
अवैध वाळू उत्खननात सहभाग असल्याच्या कारणावरून सध्या राकेश दुबेविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच दुबेविरोधात १५ सप्टेंबर रोजी बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल केल्यानंतर, ईओयूने त्याच्या चार परिसरांवर छापा टाकला. एसके पुरी, पाटणा येथील गांधी पथच्या घरी आणि इंजीनियर नगर, जलालपूर, दानापूर येथील सुदामा पॅलेसच्या फ्लॅटवर शोध घेण्यात आला. त्याचवेळी, झारखंडमधील जसीडिह येथील सिमरिया येथील वडिलोपार्जित घर आणि जसीडिह येथील सचिंद्र रेसिडेन्सी नावाच्या हॉटेलवरही छापे टाकण्यात आले. दरम्यान, राकेश दुबेने आपल्या पदाचा गैरवापर करून बरीच मालमत्ता घेतली आहे, ज्यात जमीन, फ्लॅट, दुकाने आणि भूखंड यांचा समावेश आहे. एवढेच नाही तर त्याने नातेवाईक, मित्र, व्यवसाय भागीदार आणि इतरांद्वारे मनी लॉंडरिंग करून काळ्या पैशांचे व्हाईट मनीत रुपांतर करण्याचा प्रयत्न केला. त्याने अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या कंपन्यांमध्ये रोख रक्कम गुंतवली आहे. त्याबरोबरच ख्याती कन्स्ट्रक्शनच्या बँक खात्यात २५ लाख रुपये हस्तांतरित केल्याचे पुरावेही शोध दरम्यान सापडले.
राकेश दुबे यांनी जसीडिह मधील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, सचिंद्र रेसिडेन्सी नावाचे हॉटेल, सुखदानी रेस्टॉरंट, जसीडिहमध्ये विवाह हॉल बांधून पैसे कमावले आहेत. ईओयूला त्याच्या आई आणि बहिणीच्या नावे अनेक जंगम आणि अचल मालमत्तेची माहिती देखील मिळाली आहे, ज्याची पडताळणी केली जात आहे. एसडीपीओ म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्या काळात त्याने बरीच जमीन खरेदी केली होती. राकेश दुबे यांनी अवैधरित्या कमावलेले करोडो रुपये व्याजात गुंतवले आहेत. तपासा दरम्यान तपास यंत्रणेला आढळले की राकेश दुबे यांनी त्यांच्या सेवेदरम्यान वेतन खात्यातून रोख रक्कम नगण्य काढली होती. त्याचबरोबर पती -पत्नीच्या नावाने विविध कंपन्यांच्या म्युच्युअल फंडांमध्ये सुमारे १२ लाखांची गुंतवणूक करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात राकेश दुबे याच्याकडून सुमारे २,५५,४९,६९१ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता संपादित तथा गोळा केल्याचे पुरावे मिळाले आहेत. तसेच, शोधात अनेक कागदपत्रे सापडली आहेत. अधिक तपासात त्याने मिळवलेल्या जंगम आणि स्थावर मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे.