मनाली देवरे, नाशिक.
पंजाब किंग्ज विरुध्द बाजी मारली ती दिल्ली कॅपीटल्सने आणि सनरायझर्स विरुध्द जिगरबाज खेळ करुन सामना जिंकला तो राजस्थान रॉयल्सने. आयपीएल २०२१ मध्ये रविवारी दोन सामने खेळले गेले आणि त्यांचा निकाल हा अपेक्षेप्रमाणेच आणि संघाच्या गुणवत्तेप्रमाणेच लागला. दिल्ली कॅपीटल्ससाठी तारणहार ठरला तो सलामीवर शिखर धवन तर राजस्थान रॉयल्ससाठी सलामीवर जॉस बटलर.
पंजाब किंग्जने दिल्लीला केले पराभूत
दिल्ली कॅपीटल्स हा संघ लंबी रेस का घोडा ठरतो आहे. रिकी पॉन्टींग आणि प्रविण आमरे यांच्या तालमीत तयार होत असलेल्या या संघाने पंजाब किंग्जचा ७ गडी राखून पराभव करतांना आपण प्ले ऑफच्या अंतीम ४ संघात आहोतच याची जाणीव इतर संघांना करुन दिली. दिल्लीच्या शिखर धवनने पुन्हा एकदा संकटमोचकाची भुमिका निभावून ४७ चेंडून ६९ धावा करतांना संघाला अडचणीत येवू दिले नाही आणि सिझनमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या शर्यतीत के.एल.राहूलला पुन्हा एकदा मागे टाकून पहिला नंबर गाठला. पंजाब किंग्जने दिल्ली कॅपीटल्स विरूध्दच्या सामन्यात एक मोठा बदल केला होता. त्यांनी या सामन्यात निकोलस पुरनच्या जागी डेव्हीड मलानला संधी दिली होती. या इंग्लीश फलंदाजाबाबत असे बोलले जाते की, तो ख्रिस गेलपेक्षाही खतरनाक फलंदाज आहे. आयसीसीच्या टी20 रँकींगमध्ये तो ८९२ गुणांसह पहिल्या क्रमांकावर असलेला फलंदाज आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो अरॉन फिंचचा आणि त्याचे गुण आहेत ८३०. या सामन्यात डेव्हिड मिलानची २६ चेंडूतली २६ धावांची एक छोटीशी खेळी फारशी मोठी नसली तरी त्याला प्रत्यक्ष ११ खेळाडूंच्या संघात घेतल्यानंतर पंजाब किंग्जची फलंदाजी मजबुत झाली आहे हे निश्चीत. मयंक अग्रवाल आज दुदैवाने व्यक्तीगत शतक पुर्ण करु शकला नाही, ९९ वर नाबाद राहीला परंतु, २० षटकात ६ बाद १६६ धावांचे एक समाधानकारक आव्हान दिल्लीसमोर ठेवतांना त्याने या सामन्यातल्या हिरोची भुमिका निभावली.
राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स विरुध्दचा सामना ५५ धावांनी जिंकला.
आदल्याच दिवशी झालेल्या सामन्यात सीएसकेने २०० च्या पुढे टारगेट दिल्यानंतर मुंबई इंडीयन्सने ते पुर्ण करुन सामना जिंकला होता. या सामन्यात राजस्थानने २२० धावांचे टारगेट सनरायझर्स समोर ठेवले होते. परंतु, सनरायझर्सकडे मुंबईसारखी दमदार फलंदाजी नव्हती. त्यांचा डाव २० षटकात १६५ धावांवर आटोपला आणि एकतर्फा झालेल्या सामन्याने प्रेक्षकांची निराशा केली. राजस्थानचा सलामीवीर जॉस बटलरने दिल्लीत अक्षरश: आतषबाजी केली. ८ षटकार आणि ११ चौकार, ६४ चेंडूत १२४ धावा… ! बटलरने आज हैद्राबादच्या गोलदांजांना सळो की पळो करुन सोडले. इंग्लडचा हा विकेटकिपर–कम–बॅटसमन या सामन्यात राजस्थानचा सर्वेसर्वा ठरला. जैस्वाल १७ धावांवर बाद झाल्यानंतर बटलरने संजु सॅमसन सोबत एक मजबुत भागीदारी केली आणि २० षटकात २२० धावांचा एक मजबुत डोंगर उभा केला. सनरायझर्सकडे चांगले गोलंदाज आहेत पण त्यांच्या गोलंदाजीची धार बोथट झाली आहे. भुवनेश्वरला बळी मिळेनासे झाले आहेत, रशिद खानकडून चमत्काराची अपेक्षाच आहे तर संदीप शर्मा, खलील अहमद, विजय शंकर यांना त्यांच्या चांगल्या कामगिरीची अजुनही वाट बघावी लागतेय. अखेर या मोठया धावसंख्येपुढे सनरायझर्सच्या फलंदाजांना खेळपट़टीवर पाय रोवून उभे रहायचे गणित जमलेच नाही आणि एका मोठया पराभवासह गुणतालिकेत गाठलेला तळ सोडता आला नाही.
सनरायझर्स हैद्राबाद संघाचे नशिब काही केल्या बदलायला तयार नाही. डेव्हीड वॉर्नरकडे कर्णधारपद होते, तेव्हा संघा अपयशी होत होता. ६ सामन्यात ५ पराभव. पराभवाचा हा पराक्रम बघून वॉर्नरकडून नेत़त्व काढून घेण्यात आले आणि केन विलीयमसन याच्याकडे देण्यात आले. न्युझीलंडचा हा एक हुशार खेळाडू आहे. काही तरी चांगले घडेल, पराभवाचे सावट दुर करेल अशी अपेक्षा माञ अगदी पहिल्याच सामन्यात सपशेल फोल ठरली. सनरायझर्स हैद्राबादचा संघ राजस्थान रॉयल्स विरूध्द ५५ धावांनी पराभूत झाला. राजस्थान रॉयल्ससाठी हा केवळ एक मोठा विजयच नव्हता तर प्ले ऑफसाठी किमान चवथ्या क्रमांकावर रहाण्याच्या शर्यतीत जगण्यासाठी एक मोठी धडपड होती. आता ७ सामन्यात ६ पराभव. सनरायझर्सला आता चिंतन करावे लागेल बाकी काही नाही.
सोमवार दि. ३ मे २०२१ रोजी होणारा सामना –
कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, अहमदाबाद