नवी दिल्ली – दिल्ली कॅपीटलचा सलामीवीर शिखर धवनने आयपीएल २०२१ मध्ये शानदार पदार्पण केले असून धवनने पुन्हा एकदा चेन्नईविरुद्ध शानदार अर्धशतक केले. मुंबई येथे वानखेडे स्टेडिअममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने ५४ चेंडूत ८५ धावा फटकावल्या आणि विशेष म्हणजे यावेळी धवनने अनेक विक्रमही केले आहेत.
शिखरने आपल्या खेळीदरम्यान १० चौकार आणि दोन षटकार लगावले. यासह, आयपीएलच्या इतिहासात ६०० चौकार ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या नावे आता १७६ डावात ६०१ चौकार नोंदावले गेले आहे. त्याच्यापाठोपाठ डेव्हिड वॉर्नर असून त्याने १४२ डावात ५१० चौकार ठोकले आहेत.
धवनने आणखी एक कामगिरी आपल्या नावावर केली आणि विराट कोहलीला पराभूत केले. तो आता चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सर्व टी -२० सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. धवनने सीएसके विरुद्ध ९१० धावा केल्या आहेत तर विराटने ९०१ धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये ५० पेक्षा जास्त धावा करण्याच्या बाबतीत धवन हा विराट कोहलीबरोबर संयुक्तपणे दुसर्या स्थानावर आला आहे. दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत हे आश्चर्यकारक काम केले आहे. तथापि, यात प्रथम क्रमांकावर असणाऱ्या वॉर्नरने ५२ वेळा ही कामगिरी केली आहे.