विशेष प्रतिनिधी, मुंबई
इंडियन प्रीमियर लीगचे (IPL)चे १४ वे सत्र सुरू असून देशातील वाढत्या कोरोनाचे संकट आता स्पर्धेवरही येण्याची शक्यता आहे. सदर स्पर्धा सुरू होण्याआधीपासून आतापर्यंत चार परदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर देशातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने आणखी काही खेळाडू मायदेशी परतण्याची दाट शक्यता आहे. आता आणखी कोणते परदेशी खेळाडू माघारी जातात, याची चर्चा सुरू आहे.
आयपीएल बाबत मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर हे दोघे आयपीएलमधून माघार घेऊन लवकरात लवकर ऑस्ट्रेलियाला परतण्याची शक्यता आहे. याआधीच ऑस्ट्रेलियाच्या तीन क्रिकेटपटूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा केन रिचर्डसन आणि अॅडम झम्पा यांच्यासोबत राजस्थान रॉयल्सचा अँड्रयू टाय यांचा समावेश आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेच्या १४ व्या सिझनला परदेशी खेळाडूंच्या गळतीचे ग्रहण लागले आहे.
यापुर्वी अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी वैयक्तिक कारणामुळे ऑस्ट्रेलियाला परत जाण्याचा निर्णय घेतला आहेत. त्यामुळे ते उर्वरित आयपीएल सिझनसाठी उपलब्ध नसतील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु त्यांच्या पूर्णपणे पाठीशी असून त्यांना शक्य ती सर्व मदत करणार आहे, असे आरसीबीने जाहीर केले आहे.
दरम्यान, भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑस्ट्रेलिया सरकारकडून भारतातून येणाऱ्या विमान प्रवासावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच वॉर्नर आणि स्मिथ मायदेशी परतण्याच्या विचारात आहेत.
इतकेच नव्हे, तर खेळाडूंसोबतच आयपीएलमध्ये सहभागी असलेले ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक, समालोचक अशा एकूण ३० ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांनी आयपीएलमधून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे. ऑस्ट्रेलियन सरकारकडून लवकरच त्यांच्या देशाच्या सर्व सीमा सील करण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत ऑस्ट्रेलियानं कोणताही कठोर निर्णय घेतला तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मायदेशी परतण्यास अडचण होईल त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
तसेच दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा खेळाडू ख्रिस लीन यानं तर आयपीएल संपल्यानंतर मायदेशात परतण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारकडे चार्टड प्लेनची व्यवस्था करण्याची विनंती केल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू सुरक्षितरित्या मायदेशात परतू शकतील.
याउलट मुंबई इंडियन्सचा गोलंदाज नेथन कुल्टर नाइल याने तर बायो बबलमध्ये राहणे जास्त सुरक्षित असल्याचं म्हटले आहे. विशेष म्हणजे मागील हंगामात केन रिचर्डसन या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध एकमेव मॅच खेळली होती. तर झम्पाने एकही मॅच न खेळता माघार घेतली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर एन्ड्रयू टाय याने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली होती.